कै.किशोर सुर्यवंशी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धाः ग्रामीण भागात वातावरणनिर्मितीस मदत
नाशिकः नाशिक जिल्हा किकेट असोसिएशनतर्फे घेण्यात येत असलेल्या कै.किशोर सुर्यवंशी स्मृती चषकआंतर तालुका क्रिकेट निवड चाचणी स्पर्धा नुकतीच सुरू झाली. या स्पर्धेस ग्रामीण भागातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. यानिमित्ताने तालुकानिहाय क्रिकेट स्पर्धा सुरु झाली आहे.

तालुक्यातून दोन संघाची निवड करण्यात येणार असून जवळपास नव्वदहुन अधिक नवोदीत क्रिकेटपटूंनी यात भाग घेतला. स्पर्धेचे हे नववे वर्षे असून या टी-२० सामन्यांच्या स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांतील खेळाडूंना जिल्हास्तरावर कामगिरीचे दर्शन घडविण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे निवड समिती सदस्य जिल्ह्याच्या सर्व पंधरा तालुक्यात जाऊन निवडीची प्रक्रीया पूर्ण करत आहे. प्रत्येक तालुक्याचा अंतिम संघ निवडला जाणार आहे.
मालेगाव, निफाड,येवल्याला उत्स्फुर्त प्रतिसाद

शहरातील कल्लू स्टेडियममध्ये महापलिका आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएसनचे बाळू मंडलीक,संजय पराडे यांच्या उपस्थितीत तालुका क्रिकेट संघाच्या खेळाडूंची निवड प्रक्रीया राबविण्यात आली. या निवड प्रक्रीयेत दिडशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. शैलेश परदेशी व अमिन अन्सारी यांचे क्रिकेटपटूंना मार्गदर्शन लाभले. अझर अन्सारी, अक्षय सोनार,हेमत संधानशिव,अमोल शिंदे व पुरुषोत्तम जगताप यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. निफाड येथील निवड चाचणी स्पर्धेतही चांगला प्रतिसाद लाभला. या ठिकाणी जवळपास एैंशीहुन अधिक क्रिकेटपटूंनी आपला सहभाग नोंदवला.



