इंडिया `ब` संघाची श्रीलंका, `इंडिया `ए पाठोपाठ वेस्ट इंडीजवर मात

चौरंगी मालिकेत ईश्वरी सावकारचे सातत्यपूर्ण योगदान

श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धच्या चौरंगी मालिकेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील इंडिया बी संघातर्फे नेहमीप्रमाणे सलामीला फलंदाजीला येत प्रभावी कामगिरी करतांना वेस्ट इंडीज वरील विजयात मोठा वाटा उचलला.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धची १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी चौरंगी मालिका सध्या वायझॅग इथे सुरू आहे. त्यातील ईश्वरीच्या इंडिया बी संघाचा तिसरा साखळी सामना वेस्ट इंडीज विरुद्ध झाला. वेस्ट इंडिज विरुद्धच्या या एकतर्फी झालेल्या सामन्यात विजयासाठी ४५ धावांचा पाठलाग करताना ईश्वरी सावकारने सलामीला येत केवळ २६ चेंडूत ६ चौकारांसह ३२ धावांचे योगदान दिले व इंडिया बी संघाला ८ गडी राखून विजय मिळवण्यात मोठी कामगिरी बजावली. ईश्वरीच्या इंडिया बी संघाने यापूर्वीचे श्रीलंका व इंडिया ए विरुद्धचे दोन्ही सामने जिंकले होते . या तीनही सामन्यांत इंडिया बी संघाच्या विजयात ईश्वरी सावकारने मोठा वाटा उचलला . पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ४८ चेंडूत ३० धावा , दुसर्‍या सामन्यात इंडिया ए विरुद्ध ३२ चेंडूत ६ चौकारांसह ३६ धावा व वेस्ट इंडीज विरुद्ध २६ चेंडूत ३२ धावांचे योगदान देत सातत्यपूर्ण फलंदाजीचे प्रदर्शन केले.

ईश्वरीची घौडदौड सुरुच

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारला उदयोन्मुख होतकरू क्रिकेट पटूंना मिळणारी मानाची इंडियन ऑईल शिष्यवृत्ती मिळाली आहे . ईश्वरी सावकारची यंदा १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. मागील हंगामात ईश्वरी सावकार ची चॅलेंजर ट्रॉफी साठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झालेली होती. तसेच १९ वर्षांखालील चॅलेंजर ट्रॉफी व नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी दोनदा ईश्वरी ची निवड झाली आहे.

चौरंगी मालिकेतील या तीन विजयांमुळे इंडिया बी संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असून अंतिम सामना इंडिया ए बरोबर १९ नोव्हेंबरला नियोजित आहे. ईश्वरीच्या ह्या अतिशय सातत्यपूर्ण प्रभावी कामगिरीमुळे नाशिकच्या खास करून मुलींच्या , महिला क्रिकेटविश्वात उत्साहमय वातावरण निर्माण झाले असून, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , यांनी ईश्वरी सावकारला शाबासकी देत अभिनंदन केले व अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

X