ईश्वरी सावकारचे घणाघाती दीडशतक,तडाखेबाज फटकेबाजी

बीसीसीआयच्या १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय स्पर्धा:विदर्भ संघावर मोठा विजय,नाशिकच्या महिला क्रिकेटपटूची चमकदार कामगिरी,पात्रता फेरीतून बाद फेरीत प्रवेश

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला एकदिवसीय सामन्यांच्या डेहराडून येथे खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत घणाघाती दिडशतक झळकवत अफलातून फलंदाजीचे प्रदर्शन घडवले. नाशिकच्या महिला क्रिकेटपटूने प्रथमच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला स्पर्धेत कर्णधारपद भूषवत असे शतकच नव्हे तर दिडशतक झळकवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

१९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची कर्णधार ईश्वरीने १५५ चेंडूत २० चौकार व एक षटकार ठोकत १५१ धावा फटकावल्या. यामुळे महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ५ बाद २७७ अशी धावसंख्या उभारली . ईश्वरीला के एन मुल्ला ने नाबाद ५८ धावा करून साथ दिली. उत्तरादाखल विदर्भ संघाला ५० षटकांत ८ बाद १८५ इतकीच मजल मारता आली व महाराष्ट्राने ईश्वरी सावकारच्या नेतृत्वात ९३ धावांनी मोठा विजय मिळवला . नाशिकची अष्टपैलु शाल्मली क्षत्रियची देखील या महाराष्ट्र संघात असून तिने दोन षटकात ९ धावा दिल्या.

तुफान फटकेबाजीने वेधले लक्ष

डेहराडून येथे खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत ईश्वरी सावकारने विजयी सुरुवात केली , महाराष्ट्र संघाने अरुणाचल व पॉंडेचरी पाठोपाठ गोवा संघावर ९ गडी राखून जोरदार विजय मिळवला होताच . प्रथम फलंदाजी केलेल्या गोवाला ३६ षटकांत ६६ धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार ईश्वरी सावकारने नाबाद ३२ धावा करत महाराष्ट्र संघाला ११ व्या षटकातच ९ गडी राखून विजयी केले होते . तर शाल्मली क्षत्रियने ५ षटकांत १३ धावा दिल्या व एक गडी बाद केला. आता विदर्भ संघालाही पराभूत केले. ईश्वरी सावकारच्या नेतृत्वात हा पांच सामन्यातील चौथा विजय आहे.

ईश्वरी सावकारच्या या अफलातून फलंदाजीमुळे व एक प्रकारच्या ऐतिहासिक कामगिरीने नाशिक क्रिकेट वर्तुळात अतिशय उत्साहाचे व आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. ईश्वरीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी ईश्वरी सावकारला शाबासकी देत खास अभिनंदन करून पुढील अशाच जोरदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

X