१९ वर्षांखालील महिलाची एकदिवसीय स्पर्धा: अरूणाचल प्रदेशवर सहा गडी राखून मात

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत विजयी सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला एकदिवसीय सामन्यांच्या डेहराडून येथे सुरू झालेल्या स्पर्धेत , महाराष्ट्र संघाने अरुणाचलवर ६ गडी राखून विजय मिळवला. नाशिकची अष्टपैलु शाल्मली क्षत्रियची देखील या महाराष्ट्र संघात आहे.

महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धे नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ईश्वरी सावकारची कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली आहे. नुकतीच श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धच्या चौरंगी मालिकेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील इंडिया बी संघातर्फे सलामीला फलंदाजीला येत प्रभावी कामगिरी केली होती. मागील हंगामात ईश्वरी सावकारची चॅलेंजर ट्रॉफी साठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झालेली होती . तसेच सुरत येथे झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राज्यस्तरीय महिला ५० षटकांच्या स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे सलामीवीर म्हणुन खेळताना ईश्वरी सावकार ने फलंदाजीचे जोरदार प्रदर्शन केले होते .

नाशिक जिल्हा क्रिकेट संघ सदस्य अष्टपैलु शाल्मली क्षत्रिय उदयोन्मुख जलदगती गोलंदाज व सलामीवीर आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत या केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच आधी महाराष्ट्राच्या संभाव्य संघात व आता अंतिम संघात निवड झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला नाशिक येथे पार पडलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत शाल्मलीने सर्वोच्च ५७ धावसंख्येसह ३ डावात एकूण ८७ धावा केल्या व अतिशय मोक्याच्या क्षणी दोन महत्वाचे बळी घेत नाशिक संघाला विजयी केले होते.अरुणाचल संघाला ७४ धावांत रोखत विजयासाठीच्या ७५ धावा ४ गड्यांच्या मोबदल्यात करून अरुणाचलवर ६ गडी राखून विजय मिळवला. शाल्मली क्षत्रियने ४ षटकांत १० धावा दिल्या तर ईश्वरी सावकारने ११ धावा केल्या. महाराष्ट्राचा पुढील सामना ८ डिसेंबरला पॉंडेचरी बरोबर आहे.

या विजयाबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व प्रशिक्षक यांनी ईश्वरी सावकार व शाल्मली क्षत्रियचे अभिनंदन करून पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.