`एनडीसीए`सुवर्णमहोत्सवात दिमाखदार सोहळ्याने रंगत

स्मरणिका प्रकाशन, खेळाडूंचा गौरवः एमसीए पदाधिकाऱ्यांच्या सहभागाने सोहळ्यास लागले चारचॉँद`

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) चा सुवर्णमहोत्सवी सोहळा खास विशेष स्मरणिका प्रकाशन ,मान्यवरांचे मनोगत व आजी, माजी खेळाडूंचा गौरव करून, हुतात्मा अनंत कान्हेरे (गोल्फ क्लब) मैदानावर दिमाखात संपन्न झाला .याप्रसंगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – चे भूतपूर्व सेक्रेटरी अजय शिर्के , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांची विशेष उपस्थिती होती.

या विशेष सोहळ्यात अजय शिर्के व रोहित पवार यांचे शुभ हस्ते एन डी सी ए च्या पन्नास वर्षाच्या वाटचालीवर आधारीत विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. याप्रसंगी मंचावर आमदार देवयानी फरांदे , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत , सचिव सुरेन्द्र भांडारकर , खजिनदार संजय बजाज, एन डी सी ए चे माजी चेअरमन विलासभाऊ लोणारी व गजाभाऊ अहिरे , एन डी सी ए चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे उपस्थित होते.

या सोहळ्यात एन डी सी ए चेअरमन विनोद शहा यांनी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेतला. त्यात खास करून २० वर्षांपूर्वी माननीय अजय शिर्के महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत सर्व जिल्ह्यांना कसे प्रतिनिधित्व मिळाले हे विशद केले. विनोद शहा तेव्हाच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष झाले होते. सर्वश्री शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यावर नाशिकमध्ये २३ वर्षांनंतर रणजी सामना आयोजित करण्यात कशी मदत झाली व तेव्हापासून गेल्या २० वर्षांत एन डी सी ए ने १० रणजी सामने कसे आयोजित करून दाखवले हे सांगितले.

विनोदजी,विलासभाऊंची फटकेबाजी

एन डी सी ए चे माजी चेअरमन विलास लोणारी यांनी अतिशय सुरवतीच्या काळातील आठवणींचा नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचा खडतर प्रवास उलगडला. त्यात विशेष करून हुतात्मा अनंत कान्हेरे व महात्मा नगर क्रिकेट मैदानांचा कसा कायापालट केला ते संगितले. अजय शिर्के यांनी देखील विनोद शहा यांच्या महाराष्ट्र व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन मधील कारकीर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख करत सर्व सामने आयोजित करण्याच्या कुशल नियोजनाचे खास कौतुक केले. विनोद शहा यांना आपल्या वैयक्तिक संग्रहातील , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम , पुणे येथे झालेल्या पहिल्या एक दिवसीय सामन्यात खेळलेल्या भारतीय संघातील सदस्यांची स्वाक्षरी असलेली बॅट सप्रेम भेट दिली.

एमपीएल चे पुन्हा आयोजन,अध्यक्षांची ग्वाही

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोहित पवार यांनी आपल्या भाषणात असोसिएशनच्या माजी अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा सर्व कारभार , खेळाडूंची निवड यासारख्या सर्व बाबी अतिशय पारदर्शक पणे होतील याची ग्वाही दिली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( इन्विटेशन लीग ) जास्तीच्या संघ सहभागाबद्दल सांगत आय पी एल च्या धर्तीवरील एम पी एल चे हि पुन्हा आयोजन करणार असल्याची खुशखबर दिली. सी ओ सी मुख्य माजी रणजी पटू राजेंद्र लेले यांनी खेळाडूंतर्फे समर्पक भावना व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव रियाज बागवान , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सर्व आजी व माजी पदाधिकारी ,निवड समिति सदस्य , प्रशिक्षक , पंच , खेळाडू व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 thought on “`एनडीसीए`सुवर्णमहोत्सवात दिमाखदार सोहळ्याने रंगत

Leave a Reply

Your email address will not be published.

X