स्मरणिका प्रकाशन: सोहळ्याचे साक्षीदार होण्याची नाशिककरांना सुवर्णसंधी

नाशिकः संघटना,खेळाडू,प्रशिक्षक,संघटक अशा सर्वांच्या कामगिरीने महाराष्ट्रासह देशाचे लक्ष वेधणारी संघटना म्हणजे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन अर्थात एनडीसीए. एनडीसीए आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत असून हा सोहळा शनिवारी(ता.२५) सांयकाळी सहाला हुतात्मा अनंत कान्हेरे(गोल्फ क्लब) मैदानावर होत आहे.
या सोहळ्याच्या निमित्ताने पन्नास वर्षाच्या वाटचालीवर आधारीत एक विशेष स्मरणिका काढण्यात आली असून तिचे प्रकाशनही याच कार्यक्रमात होईल. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या खेळांडूनी नाशिकला वैभव प्राप्त करून दिले,अशा सर्वच प्रमुख खेळाडूंचा गौरव जिल्हा असोसिएशनतर्फे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. एनडीसीए नाशिक जिल्ह्यातील खेळाडू,प्रशिक्षक संघटकांचे हक्काचे असोसिएशन आहे. अर्थात यासाठी अध्यक्ष विनोद(धनपाल) शहा यांच्या नेतृत्वाखाली सर्वचजण मेहनत घेत आहे. अगदी ग्रामीण भागातील उदयोन्मुख क्रिकेटपटूला प्रशिक्षणासह सर्व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. क्रिकेटपटू हा नियमित सरावात राहावा, या उद्देशाने आंतरतालुका क्रिकेट स्पर्धाबरोबरच जिल्हास्तरावर विविध स्पर्धां भरविण्यात असोसिएशनचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. राज्य-राष्ट्रीयस्तरापर्यत नाशिक जिल्ह्याचे क्रिकेटपटू पोहचावे,यासाठी नावाजलेल्या प्रशिक्षकांच्या माध्यमातून नेहमीच मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यातूनच पन्नास वर्षात अनेक क्रिकेटपटूनी रणजी संघाबरोबरच भारतीय अ.ब व इतर संघात स्थान मिळवून एनडीसीए चा पर्यायाने नाशिक जिल्ह्याचा नावलौकीक वाढवला आहे, ही निश्चित गौरवास्पद बाब आहे.
महिला संघाने खोवला मानाचा तुरा
नाशिकच्या उदयोन्मुख, नावाजलेल्या क्रिकेटपटूबरोबरच महिला संघही मागे राहिलेला नाही, या संघाची घौडदौड निश्चितच कौतुकास्पद आहे. माया सोनवणे,ईश्वरी सावकार यांच्यासह रसिका शिंदे , प्रियांका घोडके, साक्षी कानडी , लक्ष्मी यादव व शाल्मली क्षत्रिय यासारख्या क्रिकेटपटूंची कामगिरी उल्लेखनीय अशीच म्हणता येईल, गोलंदाजी,फलंदाजी,क्षेत्ररक्षण अशाच सर्वच बाबतीत या क्रिकेटपटूंनी सर्वीत्तम कामगिरी बजावत बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले त्यामुळे नावाजलेल्या सघाबरोबरच खेळतांना या खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावरच भारतीय संघाने यश मिळविल्याचेही आपण पाहिले आहे. महिला खेळाडूंची ही घौडदौड नाशिककरांसाठी अभिमानास्पद बाब अशीच म्हणता येईल, या क्रिकेटपटू नाशिककरांचे भूषण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Yes mi pilyar