`एनडीसीए` तर्फे शनिवारी सुवर्ण महोत्सव लोगो अनावरण

किशोर सूर्यवंशी व सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफीचे बक्षिस वितरण: वर्षभर स्पर्धांचे यशस्वी आयोजन

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशनला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली असून सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सव लोगो चे अनावरण आणि किशोर सूर्यवंशी आंतर तालुका व सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफी या क्रिकेट स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ ३१ डिसेम्बर सायंकाळी ४.३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान,गोल्फ क्लब येथे आयोजित केला आहे.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एन डी सी ए ) यंदा सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून, एन डी सी ए, क्रीडा व युवक सेवा संचलन, महाराष्ट्र राज्य (नाशिक जिल्हा क्रीडा विभाग) च्या भागीदारीत इंडियन ऑइल आंतर-शालेय क्रिकेट स्पर्धा दि. १ ते १२ ऑक्टोबर २०२२ यशस्वीरीत्या खेळविण्यात आली.

सुर्यवंशी ट्रॉफीत एकूण २७ सामने

तर २२ ते २७ नोव्हेंबर २०२२ दरम्यान किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी स्पर्धेचे हे सलग नववे वर्ष होते . यंदाच्या टी-ट्वेंटी स्वरूपातील सामन्यांच्या स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडूंना जिल्हास्तरावर आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. खास या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध निवड समिती सदस्यांनी जिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यात जाऊन निवडीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक तालुक्याचा अंतिम संघ निवडला होता .यंदा जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. नॅशनल अग्रो पोलिक्लिनिकचे सहकार्य देखील या स्पर्धेस लाभले . उद्घाटनास सूर्यवंशी परिवारातर्फे अर्णव व भूषण सूर्यवंशी तर नॅशनल अग्रो पोलिक्लिनिक तर्फे निमसे व अमोल काळे उपस्थित होते. चार गटात १६ संघात २२ ते २७ नोव्हेंबर एकूण २४ साखळी व बाद फेरीचे ३ असे एकूण २७ सामने झाले . अंतिम सामन्यात मालेगाव बी संघाने मालेगाव ए संघावर २५ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकवले.

भालेकर ट्रॉफीत २४ साखळी सामने

सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफी चे सामने सध्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान,गोल्फ क्लब येथे रंगत आहेत. नाशिकचे लोकप्रिय, आदर्श माजी खेळाडू तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन पद भूषविलेल्या सुधाकर भालेकर ह्यांच्या स्मरणार्थ खेळविल्या जाणार्‍या स्पर्धेचे हे दहावे वर्षं. दरवर्षीप्रमाणेच स्टार ईलेवनचे भालचंद्र गोसावी, चंद्रशेखर- बंडू – दंदणे, तरुण गुप्ता ह्यांचेसह, सुधाकर भालेकर ह्यांचे सुपुत्र प्रशांत भालेकर ह्यांचा सहयोग स्पर्धा आयोजनासाठी मिळत आहे. स्टार ईलेवन, नाशिकरोड पुरस्कृत, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित ही स्पर्धा यंदा खुल्या गटातील नाशिकच्या निवडलेल्या १६ संघांमध्ये चार गटात , टी ट्वेंटी स्वरूपात खेळवली जात आहे. २२ ते ३० डिसेंबर २४ साखळी सामन्यांनंतर चार गटविजेत्यांत ३१ डिसेंबर रोजी उपांत्य व अंतिम सामने रंगतील. नाशिकचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी दिवंगत बाबा शेट्टी, शेखर गवळी, अविनाश आघारकर, विजय भोर, जयंतीलाल अशा नावांनी १६ संघात , नाशिकच्या अंतिम तसेच नियोजित एन पी एल स्पर्धा संघ निवडीच्या हेतूने सदर स्पर्धा अतिशय उत्साहात खेळविली जात आहे.

अशा या वरील दोन नाशिकच्या क्रिकेटपटूंसाठी महत्वाच्या असलेल्या क्रिकेट स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ व सुवर्ण महोत्सवी वर्ष लोगो अनावरण ३१ डिसेम्बर सायंकाळी ४.३० वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान,गोल्फ क्लब येथे आयोजित केला आहे. याची सर्व क्रिकेट रसिकांनी नोंद घ्यावी व कार्यक्रमाला उपस्थित रहावे.

Leave a Reply

Your email address will not be published.

X