हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी: एफसीसीबी कर्णधार दिग्विजय सिंगची हॅटट्रीक, विजयात उचलला महत्वपुर्ण वाटा

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान,(गोल्फ क्लब)वर तिसऱ्या दिवशी एफ सी सी बी व बोराडे इलेव्हनने यांनी आज आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत आपले विजय नोंदवले. दिग्दविजय सिंगने नोंदवलेली हॅटट्रीक हे आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठऱले..
कर्णधारपदाला साजेशी दिग्विजय सिंगची कामगिरी
पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून एफ सी सी बीने एव्हरशाईनला प्रथम फलंदाजी दिली. नाबाद ८९ अशा चांगल्या सुरुवाती नंतर ५ बाद १३५ वरुन एफ सी सी बीचा कर्णधार दिग्विजय सिंगच्या हॅटट्रिक मुळे एव्हरशाईन २५. ५ षटकांत १६५ धावांवर सर्वबाद झाले. सलामीवीर कुणाल कातकाडेने सर्वाधिक फटकेबाज ५३ तर सुजय निकम ने ३५ धावा केल्या. अतुल भवर व चंदन साहने प्रत्येकी २ गडी बाद केले. उत्तरादाखल एफ सी सी बी ने सलामीवीर अविनाश थोरातच्या ७६ धावांच्या जोरावर ३२ व्या षटकांत ३ गडी राखून विजय मिळवला. शुभम ढोमसेने ३१ व दिग्विजय सिंगने नाबाद २१ धावा करत विजय निश्चित केला. एव्हरशाईनच्या नीलेश सिंग , विकास केंद्रे व विश्वेश ने प्रत्येकी २ गडी बाद केले.
दुसरा सामनाही रंगतदार
दुसऱ्या सामन्यात बोराडे इलेव्हनने सय्यद मुशिर विरुद्ध प्रथम फलंदाजी करत ४० षटकांत ९ बाद २१२ धावा केल्या. कर्णधार जयप्रकाश बोराडेने सर्वाधिक ७७ तर दिव्यकृष्णा नागरेने ४७ व गौरव शहाणेने ३५ धावा केल्या. सय्यद मुशिरच्या अखलाख शेख ने ४ तर फैजान सय्यद ने २ बळी घेतले. उत्तरादाखल बोराडे एलेवननच्या रोहित गिरीने व गौरव शहाणेने ३ बळी घेत सय्यद मुशिरला ३२.३ षटकांत १५७ धावांत रोखत बोराडे एलेवनला ५५ धावांनी विजयी केले. सय्यद मुशिरच्या इरफान मंसूरी व अकीब शेख ने प्रत्येकी ३३ धावा केल्या.
सामना पाहण्याची सुवर्णसंधी
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन – एन डी सी ए – ची डिजिटल सहयोगी स्पोर्टवोट, मुंबई ने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रसारण सुरू केले आहे. स्पोर्टवोट हे अॅप डाउनलोड करून सर्व क्रीडाप्रेमी या सामन्यांचा आनंद कोठूनही थेट घेऊ शकतात.