‘एमसीए’ च्या विविध समित्यांवर नाशिकचे पाच जण

किरण जोशी रणजी निवड समिती सदस्य

नाशिक- नाशिकच्या क्रीडाक्षेत्रासाठी एक आनंददायी बातमी आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची यंदा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ( एम सी ए) च्या महत्वाच्या पदांवर वर्णी लागली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अतिशय महत्त्वाच्या क्रिकेट ऑपरेशन कमिटी( सी ओ सी) वर नाशिकचे रणजीपटू प्रशांत राय यांची, सलग तिसर्‍यांदा निवड झाली आहे. क्रिकेट ऑपरेशन कमिटी ही महाराष्ट्र क्रिकेटचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय घेते. श्री. राय यांनी यापूर्वी महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य तसेच २३ वर्षाखालील संघाचे निवड समिती सदस्य आणि १९ व १६ वर्षांखालील संघाचे निवड समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

जोशी दुसऱ्यांदा निवड समिती सदस्य

किरण जोशी उर्फ के व्ही – जोशी यांची महाराष्ट्र रणजी मुख्य, वरिष्ठ संघाचे निवड समिती सदस्य पदी सलग दुसर्‍यांदा निवड झाली आहे. किरण जोशी यांनी यापूर्वी देखील महाराष्ट्र संघाचे १९ वर्षांखालील निवड समिती चे सदस्य म्हणुन बरीच वर्षे काम केले आहे.

काकड,घोष,यादव यांनाही संधी

नाशिकचे रणजीपटू भगवान काकड महाराष्ट्राच्या २५ वर्षाखालील निवड समिती सदस्य म्हणून निवड झाली. मागील वर्षी ते १९ वर्षांखालील निवड समितीवर होते. दुसरे रणजीपटु शेखर घोष ह्यांची देखील १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणुन सलग तिसर्‍यांदा नियुक्ती झाली आहे. शेखर घोष ह्यांना हयापूर्वी देखील २३, १९ व १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. नाशिकच्या विनोद यादव यांची यंदाही महाराष्ट्राच्या २५ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी शारीरीक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. हयापूर्वी देखील विनोद यादव यांनी १६ व २३ वर्षांखालील संघाचे शारीरीक प्रशिक्षक हे पद भूषविले होते. विनोद यादव गेल्या तीन वर्षांपासून नाशिक क्रिकेट संघटनेच्या पुरुष व महिला खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन करीत आहेत. नवीन २०२२-२३ हंगामासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ह्या नेमणुका पुणे येथे जाहीर करण्यात आल्या . महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन वरील राज्यस्तरीय निवडींमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

X