पंधरा तालुक्यात निवड प्रक्रीया: प्रत्येकी तीन साखळी सामन्यातून बाद फेरीत प्रवेशाची संधी, चार गटात सोळा संघाचा सहभाग

नाशिक-राजेंद्र (नाना) सूर्यवंशी यांच्या सहकार्याने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात येत असलेल्या कै. किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरवात झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन सूर्यवंशी परिवारातील अर्णव सूर्यवंशी व भूषण सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते नाणेफेकीने झाले. नॅशनल अग्रो पोलिक्लिनिकचे देखील या स्पर्धेस सहकार्य लाभत आहे. नॅशनल अग्रो पोलिक्लिनिकचे श्री निमसे व श्री अमोल काळे हे उद्घाटन सोहळयास उपस्थित होते . किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी स्पर्धेचे हे सलग नववे वर्ष आहे. या टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेमुळे नाशिक जिल्ह्यातील तालुक्यातील खेळाडूंना जिल्हास्तरावर आपल्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते. खास या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध निवड समिती सदस्यांनी जिल्ह्याच्या सर्व १५ तालुक्यात जाऊन निवडीची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक तालुक्याचा अंतिम संघ निवडला .
स्थानिक होतकरू क्रिकेटपटूंच्या कौशल्याला संधी

जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून प्रत्येकी तीन साखळी सामन्यानंतर बाद फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे. चार गटात १६ संघात २२ ते २६ नोव्हेंबर एकूण २४ साखळी सामने होणार असून २७ नोव्हेंबर रोजी उपांत्य व अंतिम फेरीचे सामने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे नियोजित आहेत. उद्घाटनप्रसंगी बोलताना नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव समीर रकटे यांनी या स्पर्धेमुळे तालुका स्तरावरील होतकरू खेळाडूंनाही जिल्हास्तरावर आपली कामगिरी प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ मिळण्याचा व त्याद्वारे प्रगती करण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता तो सफल होत असल्याचे सांगितले. सदर स्पर्धेतील चांगली कामगिरी करणार्या खेळाडूंना सुधाकर भालेकर ट्रॉफी व नंतर नाशिक प्रिमियर लीग मध्ये खेळण्याची संधी मिळेल. सूर्यवंशी परिवारातर्फे अर्णव व भूषण सूर्यवंशी तर नॅशनल अग्रो पोलिक्लिनिक तर्फे निमसे व अमोल काळे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. उद्घाटनाच्या वेळी नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे खजिनदार हेमंत देशपांडे , पदाधिकारी संजय परीदा, बाळू मंडलिक , तसेच मंगेश शिरसाट, शिवाजी जाधव , संदीप सेनभक्त , नाशिक ग्रामीण, कळवण व दिंडोरी च्या संघ संघातील खेळाडू, पंच आदी उपस्थित होते.
आज हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, मैदानावर एकूण चार सामने खेळवण्यात आले .त्यात चांदवड , दिंडोरी तर कळवण ने दोन सामने जिंकले. त्यात फलंदाजीत कळवणच्या वसीम बारी ने ३५ , ललित पगार ने ४३ , सुरगणाच्या सुनिल हडस ने ४७ व चांदवडच्या महेश धातकोडे ने ४६ तर गोलंदाजीत सुरगणाच्या मनोज महालेने ५ बळी घेत प्रभावी कामगिरी केली.
संक्षिप्त धावफलक, निकाल पुढील प्रमाणे:
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान –
1) चांदवड विरुद्ध सिन्नर – चांदवड ७ बाद १३२ वि. सिन्नर ६ बाद १२४. चांदवड ८ धावांनी विजयी.
2) नाशिक ग्रामीण विरुद्ध कळवण – नाशिक ग्रामीण सर्वबाद ७९ वि कळवण ३ बाद ८४. कळवण ७ गडी राखून विजयी..
3) कळवण विरुद्ध सुरगणा – कळवण ९ बाद १७० वि सुरगणा सर्वबाद ११७. कळवण ५३ धावांनी विजयी.
4) चांदवड विरुद्ध दिंडोरी – चांदवड सर्वबाद १२३ वि दिंडोरी ८ बाद १२४. दिंडोरी २ गडी राखून विजयी.