बारामतीचा डंका- मनपा आयुक्त पुलकुंडवार,इंडियन ऑईलचे जीएसपी सिंग यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण,पारख मालिकावीर,देवडे सामनावीर

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए ) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्ताने एन डी सी ए व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बारामतीच्या के ए सी एफ संघाने सेंट लॉरेन्स संघावर दहा गडी राखून सफाईदारपणे विजय नोंदवत चषक पटकावला.
अंतिम सामन्यानंतर महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व इंडियन ऑईलचे जी एस पी सिंग यांच्या हस्ते विजेत्या संघाला गौरविण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात आयुक्तांनी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन ( एन डी सी ए) व इंडियन ऑईलचे उत्तम स्पर्धा आयोजनाबद्दल कौतुक केले. तसेच भविष्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. आयुक्तांच्या हस्ते विजेत्या संघाला इंडियन ऑईल आंतरशालेय चषक प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुंबईचे आयपीएल खेळाडु रोहित राजे , इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे : कार्यकारी संचालक जी एस पी सिंग, सरव्यवस्थापक राजीव शर्मा , नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, एन डी सी ए चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे ,सी ओ सी मुख्य माजी रणजी पटू राजेंद्र लेले , माजी विक्रीकर उपायुक्त प्रशांत सातव उपस्थित होते.
दहा गाडी राखून दणदणीत विजय
या इंडियन ऑईल आंतरशालेय चषक स्पर्धेत ११ दिवस खेळल्या गेलेल्या एकूण ५८ सामन्यांनंतर स्पर्धेचा विजेता निश्चित झाला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर हा सामना झाला. स्पर्धेत खास बाब म्हणून समावेश केलेल्या बारामतीच्या के ए सी एफने सेंट लॉरेन्सवर १० गडी राखून मोठा विजय मिळवला. अंतिम सामन्यात फलंदाजीत के ए सी एफ , ची सलामीवीर जोडी वेदांत देवडे व भाविका अहिरे यांनी नाबाद अर्धशतके झळकवली . वेदांत देवडेने लागोपाठ तीन अर्धशतके केली. सेंट लॉरेन्सच्या चिन्मय भास्कर व प्रणव येवले सलामीवीरांनीच ४४ व ३४ धावा केल्या. तर गोलंदाजीत तन्मय माने व आर्य कुमावत ने प्रत्येकी २ गडी बाद केले व संघाच्या विजयाला हातभार लावला .प्रथम फलंदाजी मिळालेल्या सेंट लॉरेन्सने सलामीवीर चिन्मय भास्करच्या ४४ व प्रणव येवलेच्या ३४ तसेच अवांतर २७ धावांमुळे ३५ षटकांत ६ बाद १२५ धावा केल्या.बाकी फलंदाज विशेष योगदान देऊ शकले नाहीत. के ए सी एफ तर्फे तन्मय माने व आर्य कुमावत ने प्रत्येकी २ तर साईराज शेलार व वेदांत देवडेने प्रत्येकी १ गडी बाद केला. विजयासाठीच्या १२६ धावा के ए सी एफच्या , स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणार्या बारामतीच्या भाविका अहिरे नाबाद ५७ व वेदांत देवडे नाबाद ५६ या सलामीच्या जोडीने केवळ १९.४ षटकांत आरामात पार केल्या. वेदांत देवडे नाबाद ५६ व १ बळी मुळे सामनावीर ठरला.

इंडियन ऑईल मुलींच्या संघाचा विजय
महात्मा नगर मैदानावरील इंडियन ऑईल व एन डी सी ए या मुलींच्या एकमेव सामन्यात इंडियन ऑईल मुलींच्या संघाने एन डी सी ए मुलींच्या संघावर ५ गडी राखून मात केली. एन डी सी ए ने २० षटकांत केलेल्या ६ बाद ८१ धावांना उत्तर देताना इंडियन ऑईल मुलींच्या संघाने १९.२ षटकांत ५ बाद ८२ धावा करून विजय मिळवला. फलंदाजीत एन डी सी एच्या निशी नाबाद १५ , रिद्धी खोत १० व इंडियन ऑईलच्या अस्मिता खैरनार नाबाद १२ यांनी आणि गोलंदाजीत एन डी सी एच्या काव्या दिघेने २ तर इंडियन ऑईलच्या सिद्धी पिंगळे २ व अस्मिता खैरनारने १ बळी घेत चमक दाखविली. कार्तिकी देशमुख , गौरी गुप्ता ,स्वरा सूर्यवंशी ,खुशबु सुराणा ,रिद्धी खोत व किरण जोंधळे यांनीदेखील प्रत्येकी १ गडी बाद केला. सिद्धी पिंगळे सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू ठरली.
स्पर्धेतील पुरस्कार प्राप्त खेळाडु पुढीलप्रमाणे :
मालिकावीर – साहिल पारख – ६ डावात २ शतकांसह ३८२ धावा व ७ बळी.
एन डी सी ए तर्फे विशेष पारितोषिक – कु . भाविका अहिरे, ३ अर्धशतकांसह २३७ धावा , सर्वोच्च ८७.
उत्कृष्ट फलंदाज – प्रणव येवले एका शतकासह ५ डावात २३७ धावा.
उत्कृष्ट गोलंदाज – दहा वर्षीय आर्य कुमावत ६ डावात १३ बळी .
उत्कृष्ट यष्टीरक्षक – वेदांत गोरे – यष्टीमागे एकूण १६ बळी.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक – आयुष काटकर . एकूण ७ झेल