आनंद बाबा शेट्टी स्मृति स्पर्धा- गोलंदाजीत आवारे,चव्हाण,चौधरीचे पाच बळी, गवळी,चंद्रात्रे,राऊतची अष्टपैलू कामगिरी

नाशिकः नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात येत असलेल्या १४ वर्षे वयोगटातील कै आनंद बाबा शेट्टी स्मृति स्पर्धेच्या साखळी सामन्यांत ज्ञानदीप गवळी , कार्तिक पाटील , ऋग्वेद जाधव व जीबान छेत्री यांनी शतके झळकवली . देवांश गवळीने अर्धशतक झळकविण्याबरोबरच ३ बळी तर नील चंद्रात्रेनेही दोन अर्धशतके झळकवत दोन दोन बळी घेतले. भूषण राऊतने ४७ धावा व ६ बळी मिळवत अष्टपैलू कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. गोलंदाजीत सायुज्य चव्हाण , अंजन आवारे व आर्यन चौधरी यांनी प्रत्येकी ५ बळी घेतले . या सर्व खेळाडूंनी पुढीलप्रमाणे आपापल्या संघांच्या विजयात मोठा वाटा उचलला.
चोवीस संघ,सहा गटात साखळी सामन्याने चुरस
१४ वर्षे वयोगटातील या स्पर्धेत, एकुण २४ संघ सहभागी झाले असुन ६ गटात साखळी सामने सुरू आहेत.
सर्वच सामन्यात चुरस,फलंदाजी,गोलंदाजीत लक्षवेधी कामगिरी
पहिल्या सामन्यात एन सी ए ने ज्ञानदीप गवळी नाबाद १८२ व ऋग्वेद जाधव नाबाद १०६ यांच्या जोरावर सिन्नर विरुद्ध ३८५ धावांचा डोंगर उभारला व नंतर सायुज्य चव्हाणने ५ गडी बाद करत एन सी एला ३१६ धावांनी मोठा विजय मिळवून दिला. दुसर्या सामन्यात द्वारका अकादमीच्या कार्तिक पाटिलच्या १५२ धावांमुळे केलेल्या २९२ धावांच्या उत्तरात अद्वैत अकादमी संघ १०१ पर्यंतच मजल मारू शकल्यामुळे १९१ धावांनी पराभूत झाला. तिसर्या सामन्यात एस जी सी ए ने देवांश गवळी नाबाद ५० व डॅन जॉनसन ४६ धावांच्या जोरावर एन डी सी ए मॉर्निंग विरुद्ध ३०३ धावा केल्या. नंतर गोलंदाजीत अंजन आवारे ५ व देवांश गवळीने ३ बळी घेत एन डी सी ए मॉर्निंगला ५९ धावात रोखत २४४ धावांनी विजय मिळवला.
संघाची सातत्यपूर्ण कामगिरी
चौथ्या सामन्यात नील चंद्रात्रे व ओम भामरे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर नाशिक जिमखानाने अद्वैत अकादमीला ८ गडी राखून पराभूत केले. सार्थक निकम व प्रसाद शेळके यांच्या ३ तर नील चंद्रात्रेच्याही २ बळींमुळे. अद्वैतला १४५ धावात सर्वबाद केले होते. पाचव्या सामन्यात नील चंद्रात्रेने ७९ धावा व बळी अशी अष्टपैलू कामगिरी करत नाशिक जिमखानाला रिव्होल्यूशन विरुद्ध ५ गडी राखून विजयी केले. रिव्होल्यूशनने विहान पंजाबीच्या ५५ धावांमुळे १३६ धावा केल्या होत्या . सहाव्या सामन्यात फ्रावशी अकादमीने जीबान छेत्रीच्या जोरदार १४५ धावांना आयुष सिंगच्या ५६ धावांची साथ मिळाल्यामुळे ३०९ धावा केल्या. उत्तरादाखल आर्यन चौधरीने ५ बळी घेतल्यामुळे पलोटी संघ ९७ पर्यंतच मजल मारू शकल्यामुळे फ्रावशी २१२ धावांनी विजयी झाले. सातव्या सामन्यात एन सी एने भूषण राऊतच्या ४७ धावा व ६ बळी अशा जोरदार अष्टपैलू कामगिरीमुळे भूमी अकादमी वर ७२ धावांनी विजय मिळवला.