पहिल्यांदाच राज्य संघाच्या प्रतिनिधीत्वाची संधीः नाशिकसाठी ऐतिहासिक घटना, एमसीए
कडून राष्ट्रीयस्तरावरील सर्वीत्तम कामगिरीची दखल

नाशिक- नाशिक क्रिकेट साठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बातमी. नाशिकचा रणजीपटू , गेल्या काही हंगामापासून महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला डावखुरा फिरकीपटू व खालच्या फळीतील भरवशाचा आक्रमक फलंदाज सत्यजित बच्छाव याची सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे टी-ट्वेंटी सामन्यांची स्पर्धा – सय्यद मुश्ताक अली चषक – आयोजित करण्यात येते. ११ ते २२ ऑक्टोबर मोहली, चंदिगड येथे ही स्पर्धा होणार आहे.
नाशिककरांना पहिल्यांदाच महाराष्ट्राचे कर्णधारपदाची संधी
मागील पाच वर्षांपासून मुश्ताक अली स्पर्धेत सत्यजित सातत्याने उत्कृष्ठ कामगिरी करत असल्याने ही निवड झाली आहे. २०१८-१९ ह्या वर्षी तर या स्पर्धेत सत्यजित बच्छाव ने सर्वाधिक बळी मिळवत महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीत नेण्यासाठी मोठा हातभार लावला होता व महाराष्ट्राने या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. जानेवारी २०१६ तील सर्विसेस विरुद्ध कटक येथे सुरू झालेल्या , आतापर्यंतच्या टी-ट्वेंटी च्या कारकिर्दीत सत्यजितने ३९ सामन्यातील ३८ डावात एकूण ४८ बळी घेतले असून १८ धावात ४ बळी हे त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

राष्ट्रीय पातळीवरील अशा सातत्यपुर्ण कामगिरीमुळेच गेल्या दोन हंगामापासून आयपीएल च्या लिलाव प्रक्रियेत सत्यजित चा समावेश झाला होता. आय पी एल लिलावात, २० लाख इतकी कमीतकमी बोली किंमत मिळणार्या खेळाडुंच्या , आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात समाविष्ट होता. त्याबरोबरच आय पी एल २०२२ च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स – सी एस के – तर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती . सत्यजितला चेन्नई सुपर किंग्स ने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणुन संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते.
सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी -T-20 – स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा चमु :
सत्यजित बच्छाव – कर्णधार, यश नहार , पवन शाह , नौशाद शेख – यष्टीरक्षक , कौशल तांबे , अजीम काझी, विकी ओस्तवाल, मुकेश चौधरी , आशय पालकर,राजवर्धन हंगर्गेकर, दिव्यांग हिंगणेकर,शामशुझमा काझी, मनोज इंगळे, यश क्षीरसागर , रामकृष्ण घोष , सिद्धेश वीर .
मोहली, चंदिगडला एलिट सी गटातील महाराष्ट्राचे सामने पुढीलप्रमाणे होणार आहेत : ११ ऑक्टोबर – कर्नाटक, १२ ऑक्टोबर – सर्विसेस ( सैन्यदल ) ,१४ ऑक्टोबर – जम्मु व काश्मीर , १६ ऑक्टोबर – मेघालय .
सत्यजितच्या या महाराष्ट्र संघ कर्णधार पदावरील निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.