`नाशिक`ची किंग्स स्पोर्टस क्लबवर एक डाव,३८ धावांनी विजय

वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : प्रतीकचे १०, सत्यजीतचे ६ बळी , मुर्तुझा ट्रंकवालाच्या तडाखेबाज १६७ धावा, विजयात उचलला मोलाचा वाटा

नाशिक-औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने किंग्स स्पोर्ट्स क्लब पुणे संघाविरुद्ध एक डाव व ३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात अनुक्रमे १० व ६ बळी घेणारे नाशिकचे डावखुरे फिरकीपटू प्रतीक तिवारी व रणजीपटू कर्णधार सत्यजित बच्छाव आणि धडाकेबाज १६७ धावा फटकवणारा रणजीपटू सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवाला हे विजयाचे शिल्पकार ठरले.

पहिल्या दिवशी किंग्स स्पोर्ट्स क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. पण नाशिकच्या तीन डावखुरया फिरकीपटूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे नाशिकने किंग्सला ५१.५ षटकांत १५८ धावांत सर्वबाद केले. प्रतीक तिवारीने ५ तर रणजीपटू कर्णधार सत्यजित बच्छावने ३ व तन्मय शिरोडेने २ गडी बाद केले. उत्तरादाखल सलामीवीर रणजीपटू मुर्तुझा ट्रंकवालाच्या फटकेबाज शतकामुळे पहिल्या दिवसअखेर ४२ षटकांत १ बाद १९३ अशी जोरदार मजल मारली. केवळ ८३ चेंडूत ५ षटकार व ९ चौकरांसह शतक झळकवणारा मुर्तुझा पहिल्या दिवसअखेर १४० धावांवर नाबाद राहिला. दुसऱ्या दिवशी आणखी ३२ षटकांत १२१ धावांची भर घालत नाशिकने एकूण ७४ षटकांत ५ बाद ३१४ या धावसंख्येवर १५६ धावांची आघाडी घेत डाव घोषित केला. मुर्तुझा १४२ चेंडूत ९ षटकार व १४ चौकरांसह १६७ धावा फटकावून बाद झाला. त्याने दुसऱ्या गड्यासाठी कुणाल कोठावदे ( ३९ ) बरोबर १३३ धावांची मोठी भागीदारी केली. सिद्धार्थ नक्काने नाबाद अर्धशतक केले.

नाशिकला निर्णायक विजयापासून रोखणे अशक्य

दुसऱ्या डावात किंग्स स्पोर्ट्स क्लब , पुणेने नाशिकच्या गोलंदाजीचा , खास करून फिरकीपटूंचा सामना करताना तुलनेने ६ षटके जास्ती किल्ला लढवला, पण तरीही त्यांना नाशिकला निर्णायक विजयापासून रोखता आले नाही. दुसऱ्या डावातहि प्रतीकने पुन्हा ५ व सत्यजितनेहि ३ गडी बाद केले. ऑफस्पिनर तेजस पवारने वरच्या फळीतील २ फलंदाज बाद करत त्यांना अतिशय उत्तम साथ दिल्यामुळे किंग्स ५८ षटकांत सर्व बाद ११८ पर्यंतच मजल मारु शकले व नाशिक जिल्हा क्रिकेट संघाने मोठा विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक : किंग्स स्पोर्ट्स क्लब – पहिला डाव – सर्वबाद १५८ व दुसरा डाव – सर्वबाद ११८. नाशिक – पहिला डाव – ५ बाद ३१४ . नाशिक एक डाव व ३८ धावांनी विजयी.

1 thought on “`नाशिक`ची किंग्स स्पोर्टस क्लबवर एक डाव,३८ धावांनी विजय

Leave a Reply

Your email address will not be published.

X