वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: सिद्धार्थ नक्का नाबाद १०४ , सत्यजीतचे ७ बळी

नाशिक-औरंगाबाद येथे खेळल्या गेलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, नाशिकने लातूर संघाविरुद्ध १० गडी राखून मोठा विजय मिळवला. नाबाद शतकवीर सिद्धार्थ नक्का, त्यास ७१ धावा करून साथ देणारा यष्टीरक्षक सौरभ गडाख व सामन्यात एकूण ७ बळी घेणारा रणजीपटू कर्णधार सत्यजित बच्छाव हे विजयाचे खरे शिल्पकार ठरले
पहिल्या दिवशी लातूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. नाशिकच्या गोलंदाजांनी ५३.४ षटकांत १६६ धावांत सर्वबाद केले. फिरकीपटू सत्यजित बच्छाव, तन्मय शिरोडे , प्रतीक तिवारी, तेजस पवार व जलदगती पवन सानप यांनी ६६ धावांत पहिले ५ गडी बाद केले. तेजस पवार व प्रतीक तिवारी यांनी प्रत्येकी ३ तर तन्मय शिरोडेने २ गडी बाद केले. उत्तरादाखल पहिल्या दिवसअखेर ३६ षटकांत नाशिकने ४ बाद २०० पर्यंत मजल मारली. त्यात मुर्तुझा ट्रंकवाला ५३, कुणाल कोठावदे ४४ , सिद्धार्थ नक्का नाबाद ३२ व यासर शेखने २४ धावांचे योगदान दिले.
सत्यजित कौतुकास्पद कामगिरी
दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ नक्का नाबाद १०४ व यष्टीरक्षक सौरभ गडाख ७१ यांच्या फलंदाजीच्या जोरावर नाशिकने आणखी २८ षटकांत १५४ धावांची भर घालत एकूण ६४ षटकांत ७ बाद ३५४ या धावसंख्येवर १८८ धावांची आघाडी घेत डाव घोषित केला. रणजीपटू कर्णधार सत्यजित बच्छावने ६ बळी घेत लातूरला दुसऱ्या डावात ४४ षटकांत २०१ धावांवर रोखले. लातूर ने डावाचा पराभव थोडक्यात टाळला. त्यास तन्मय शिरोडेने ३ व सिद्धार्थ नक्काने १ गडी बाद करून छान साथ दिली. विजयासाठी आवश्यक १४ धावा नाशिकने दुसऱ्याच षटकात फटकावून लातूरवर १० गडी राखून मोठा विजय मिळवत लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली.
संक्षिप्त धावफलक : लातूर – पहिला डाव – सर्वबाद १६६ व दुसरा डाव – सर्वबाद २०१ . नाशिक – पहिला डाव – ७ बाद ३५४ व दुसरा डाव – बिनबाद १४. नाशिक १० गडी राखून विजयी.