
नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रचिती भवरची पंधरा वर्षांखालील महिला महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. रांची येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे १५ वर्षांखालील महिलांसाठी ५० षटकांची एकदिवशीय सामन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात प्रचितीची निवड झाली आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणारी प्रचिती अष्टपैलू खेळाडू असून ऑफ स्पिन गोलंदाजी करते. प्रचितीच्या या निवडीमुळे सध्या महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या पुरुष व महिलांच्या सर्वच वयोगटात नाशिकचे/च्या क्रिकेटपटू राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत प्रतिनिधित्व करत आहेत असे म्हणता येईल.
१५ वर्षांखालील महीला एकदिवशीय सामन्यांच्या स्पर्धेचे साखळी सामने २६ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान रांची येथे खेळविले जाणार आहेत .
महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत : मुंबई – २६ डिसेंबर ,वडोदरा – २८ डिसेंबर , हरियाणा – ३० डिसेंबर ,पुदुचेरी -१ जानेवारी व छत्तीसगड – ३ जानेवारी.
प्रचिती भवरच्या या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व संघात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या उदयोन्मुख युवा महिला क्रिकेटपटूचे अभिनंदन करून स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.