पारख,ब्रम्हेचा याची १६ वर्षाखालील राज्य संघात निवड

आमंत्रिताच्या क्रिकेट स्पर्धेतील सातत्यपूर्ण सर्वीत्तम कामगिरीची दखल: असोसिएशनच्या विविध स्पर्धांमध्येही दोघे चमकले

नाशिक-नाशिक क्रिकेट असोसिएशनच्या साहिल पारख व दिर्घ ब्रम्हेचा यांची १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

नुकत्याच पुणे येथे झालेल्या सुपर लीगच्या फेरीसाठी डावखुरा सलामीवीर साहिल पारखने नाशिक जिल्हा संघाचे नेतृत्व केले होते. मे व जून २०२२ मध्ये नाशिक येथे सहा संघांच्या झालेल्या आमंत्रितांच्या साखळी ( इन्व्हिटेशन लीग ), स्पर्धेचे गट विजेतेपद नाशिकने पटकावले होते . पाच साखळी सामन्यांत २ निर्णायक विजय व ३ पहिल्या डावातील आघाडीचे गुण अशी प्रभावी कामगिरी नाशिक जिल्हा संघाने केली होती व त्यामुळेच सुपर लीग च्या फेरीसाठी नाशिकचा संघ पात्र ठरला होता. या सुपर लीग स्पर्धेत मधल्या फळीतील फलंदाज दिर्घ ब्रम्हेचाने नाबाद १५१ धावांची जोरदार खेळी करत लक्षवेधी कामगिरी केली होती व तीन सामन्यात एकूण २५७ धावा केल्या होत्या. साहिल पारखने ही तीन सामन्यात एकूण १५४ धावा केल्या होत्या.

मे व जून २०२२ मध्ये नाशिक येथे झालेल्या आमंत्रितांच्या साखळी ( इन्व्हिटेशन लीग ), स्पर्धेतही साहिल पारख व दिर्घ ब्रम्हेचा या दोघांनीही पाच डावात ३०० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. दोघेही उत्कृष्ट लेग स्पिनर गोलंदाज असून वेळोवेळी आपल्या गोलंदाजीने देखील नाशिक जिल्हा संघाच्या विजायांत वाटा उचलत असतात. तसेच यापूर्वीच्याही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली आहे. त्या प्रभावी कामगिरीच्या जोरावरच हि महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन विविध स्पर्धांमध्ये देखील दोघांचीही चमकदार कामगिरी होत असते.

या दोन्ही उदयोन्मुख कुमार क्रिकेट खेळाडूंच्या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या क्रिकेटपटूंचे अभिनंदन करून यापुढील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

X