पुण्याची विजयाची हॅट्रीक, ए गटाचे विजेतेपदाचा बहुमान, सांगलीचाही श्रीगणेशा

पंधरा वर्षाखालील मुलींच्या आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : सहयाद्री कदमच्या दमदार शतकासह चार बळी

नाशिक- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, १५ वर्षांखालील मुलींच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , पाचव्या सामन्यात महात्मानगर क्रिकेट मैदानावर पुणे जिल्हा संघाने साखळी स्पर्धेतील लागोपाठ तिसरा विजय नोंदवला व ए गटातील गट विजेतेपद पटकवले.

महात्मानगर क्रिकेट मैदानावर नाशिकने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. पुणेने सर्वबाद ७९ धावात नाशिक ला रोखले, ते शिवंशी कपूर व गायत्री सुर्वसे यांच्या प्रत्येकी २ बळींमुळे. त्यांना सई चव्हाण , वेदिका दळवी व सुहानी खंडाळ यांनी प्रत्येकी १ बळी घेत साथ दिली. नाशिकतर्फे आठव्या क्रमांकावरील प्राप्ती इंगळेने सर्वाधिक २६ धावा केल्या. नंतर पुणेतर्फे सुहानी खंडाळ नाबाद ३९ व ईश्वरी अवसरे नाबाद ३२ यांनी सुरेख फलंदाजी करत पुणे संघास दहा गडी राखून विजयी केले.

सहयाद्रीचे शानदार शतक,गोलंदाजीतही उत्तम कामगिरी

तर एस एस के मैदानावरील सहाव्या सामन्यात सांगलीने परभणीवर १८३ धावांनी विजय मिळवला . नाणेफेक सांगलीने जिंकून फलंदाजी स्वीकारली. निधि शांभवी १२९ व कर्णधार सह्याद्रि कदम १०६ यांनी जोरदार शतके झळकवत सांगलीला ३२३ धावा उभारून दिल्या. परभणीच्या पल्लवी लिपणेने ३ गडी बाद केले. परभणीच्या डावात सांगलीतर्फे सह्याद्रि कदमने अष्टपैलू कामगिरी करत ४ गडी बाद केले. तिला निधि शांभवी व सायली पोळ यांच्या प्रत्येकी २ बळींची साथ मिळाल्याने परभणी संघ १४० पर्यंतच मजल मारू शकला. परभणीतर्फे कर्णधार अमृता कांबळे ने सर्वाधिक ५० धावा केल्या. गतविजेता पुणे संघ सुपर लीग साठी पात्र ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published.

X