प्रतीक तिवारी, शर्विन किसवे १९ वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात

नाशिकचा राज्य संघात दबदबा कायम

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे प्रतीक तिवारी व शर्विन किसवे यांची १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. प्रतीक तिवारी डावखुरा फिरकीपटू गोलंदाज असून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत जोरदार कामगिरी केल्यामुळेच ही निवड झाली आहे. नाशिककरांसाठी ही आनंदाची बाब आहे.

प्रतीकने मागील हंगामात एप्रिल – मे २०२२ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( एम सी ए इन्विटेशन लीग ), आपल्या अचूक व भेदक गोलंदाजीने गाजविली . प्रतीकने या स्पर्धेत ५ सामन्यात तब्बल ४१ बळी मिळविले . त्याच्या जोरावर पाच साखळी सामन्यात ४ विजय मिळवत , नाशिक जिल्हा संघाने अ गट विजेतेपद पटकाविले होते . स्थानिक क्रिकेटमध्येही १९ वर्षांखालील तसेच खुल्या गटात देखील प्रतीकच्या प्रभावी गोलंदाजीचे प्रदर्शन होत असते. अंतिम संघ निवडीसाठी पुणे येथे झालेल्या संभाव्य संघातील सामन्यात देखील प्रतीकने आपल्या गोलंदाजीने छाप पाडली. वेळोवेळी केलेल्या या कामगिरीच्या जोरावरच आता प्रतीक प्रभात तिवारीची १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

शर्विन उदय किसवे याने मागील हंगामात सुद्धा महाराष्ट्र संघातर्फे १९ वर्षांखालील बीसीसीआय च्या कुच बिहार करंडक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच बीसीसीआय तर्फे आयोजित माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या , नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरासाठी शर्विनची निवड झाली होती. डावखुरा सलामीवीर शर्विन संघासाठी यष्टीरक्षकाची भूमिका देखील निभावतो . १४ वर्षे वयोगटापासूनच शर्विनने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध स्पर्धात शर्विन फलंदाजीत धावा करण्यात नेहमीच आघाडीवर असतो. शर्विन ने कुच बिहार करंडक स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे कोलकता येथे बाद फेरीतील सामन्यात मुंबईविरुद्ध त्याने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली होती . महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

या उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंच्या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीक व शर्विनचे अभिनंदन करून भविष्यातील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

X