दोन्ही चषकाचे उत्साहात वितरणः सिध्दार्थ नक्का मालिकावीर, राठोड,संधानशिव,पेंढारकर,शुमैल ठरले उत्कृष्ठ गोलंदाज,फलंदाज,डंक ठरला सामावीर अन् उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या कै.सुधाकर भालेकर व किशोर सुर्यवंशी स्मृती क्रिकेट स्पर्धेत प्रभाकर दाते संघाने भालेकर चषक तर मालेगाव ब संघाने किशोर सुर्यवंशी संघाच्या किताबाचा मानकरी ठरला.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाच्या संचालिका लीना बनसोड प्रमुख पाहुण्या होत्या. श्रीमती भालेकर , प्रशांत भालेकर व कुटुंबीय तसेच स्टार ईलेवनचे चंद्रशेखर- बंडू – दंदणे, तरुण गुप्ता, नॅशनल एग्रोचे मुजावर नबील ह्यांचेसह नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा , सचिव समीर रकटे , खजिनदार हेमंत देशपांडे , रमेश वैद्य,,राजाभाऊ भागवत तसेच इतर अनेक आजी व माजी पदाधिकारी , एन डी सी ए स्मरणिका संपादक दीपक ओढेकर आदी उपस्थित होते.एन डी सी ए निवड समिति सदस्य सतिश गायकवाड, फैय्याज गंजीफ्रॉकवाला यांसह तालुका संघ निवडणारे सर्व निवड समिती सदस्य आदी उपस्थित होते. यावेळी लोणारी ,सूर्यवंशी , स्टार ईलेवनचे चंद्रशेखर दंदणे, एन डी सी ए चेअरमन विनोद शहा यांची समयोचित भाषणे झाली. त्यात एन डी सी ए च्या इतिहासा बरोबरच वरील दोनही स्पर्धा कशा प्रकारे सुरू झाल्या हे सांगतानाच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या भावी योजनांचे सुतोवाच व खेळाडूंना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करण्यात आले. एन डी सी ए चे सचिव समीर रकटे यांनी सूत्रसंचालन केले.


सुवर्णमहोत्सवी लोगोचे अनावरण
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली असून सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने सुवर्ण महोत्सव लोगोचे अनावरण महाराष्ट्र राज्य आदिवासी महामंडळाच्या डायरेक्टर लीना बनसोड ह्यांच्या शुभहस्ते छोट्याशाच पण दिमाखदार सोहळ्यात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान,गोल्फ क्लब येथे झाले.

प्रभाकर दाते संघास विजेतेपद
याआधी सुधाकर भालेकर मेमोरियल ट्रॉफी च्या अंतिम सामन्यात प्रभाकर दाते ईलेवन संघाने शेखर गवळी ईलेवन वर ९ गडी राखून मात करत विजेतेपद पटकावले. २२ ते ३० डिसेंबर २४ साखळी सामन्यांनंतर चार गटविजेत्यांत ३१ डिसेंबर रोजी उपांत्य व अंतिम सामने रंगले. अंतिम सामन्यातील सलामीवीर मनमोहन डंकच्या ४८ चेंडूतील १०७ धावांच्या झंझावती खेळीने दाते ईलेवनला १६ व्या षटकातच मोठा विजय मिळवता आला. शेखर गवळी ईलेवनने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १४८ धावा केल्या होत्या. मनमोहन डंकने सामनावीर या बरोबरच स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टिरक्षकाचाही मान मिळवला. तर विजेत्या संघाचा कर्णधार सिद्धार्थ नक्काने मालिकावीराचा किताब पटकावला. रामचंद्र पार्टे विजेत्या संघाचे प्रशिक्षक होते. उत्कृष्ट फलंदाज स्वप्नील राठोड तर उत्कृष्ट गोलंदाज हेमंत संधानशिव ठरला.
मालेगाव संघास जेतेपद
किशोर सूर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी आंतर तालुका क्रिकेट स्पर्धेचच्या विजेत्या मालेगाव बी व उपविजेत्या मालेगाव ए संघांनाही चषक प्रदान करण्यात आले. यात चार गटात १६ संघात २२ ते २७ नोव्हेंबर एकूण २४ साखळी व बाद फेरीचे ३ असे एकूण २७ सामने झाले . अंतिम सामन्यात मालेगाव बी संघाने मालेगाव ए संघावर २५ धावांनी विजय मिळवत विजेतेपद मिळवले होते. उत्कृष्ट फलंदाज किशन पेंढारकर तर उत्कृष्ट गोलंदाज जावेद शुमैल ठरला.