विनू मंकड क्रिकेट स्पर्धा: नाशिककर प्रतिक तिवारीची चार बळी घेत स्रवीत्तम कामगिरी

नाशिक- डावखुरा फिरकीपटू गोलंदाज प्रतीक तिवारी याने पुन्हा एकदा अतिशय प्रभावी कामगिरी करून बी सी सी आय च्या विनू मंकड करंडक स्पर्धेतील उपउपांत्य फेरीत जम्मू काश्मिर विरुद्ध देखील ४ बळी घेत १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला व महाराष्ट्र संघाने रुबाबात उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रतीक तिवारीने याआधी उपउपांत्यपूर्व फेरीत दिल्लीविरुद्ध ४ बळी घेत संघाच्या विजयांत मोठा वाटा उचलला होता .
अल्लेपी , केरळ येथे आज झालेल्या उपउपांत्य फेरीत महाराष्ट्राने जम्मू काश्मिर वर १३८ धावांनी मोठा विजय मिळवला. महाराष्ट्र संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत पुन्हा एकदा तीनशेपार ८ बाद ३५७ धावा केल्या त्या अर्शिन कुलकर्णी – ११९ – च्या लागोपाठ दुसर्या शतकाच्या जोरावर , त्याला एस धस ७३, दिग्विजय पाटिल ५१ व यश बोरमणी ४० यांची साथ मिळाली. उत्तरादाखल जम्मू काश्मिर संघ ४४.१ षटकांत सर्वबाद २१९ पर्यंतच मजल मारू शकला . नाशिकच्या प्रतीक तिवारीने भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करताना १० षटकांत ४७ धावा व ४ बळी अशी प्रभावी कामगिरी केली . प्रतीकने बी सी सी आय च्या १९ वर्षांखालील विनू मंकड करंडक स्पर्धेत आतापर्यंत ५ सामन्यांत एकूण १५ बळी घेतले आहेत.
प्रतीकच्या या कामगिरीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेत आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतीकचे अभिनंदन करून यापुढील स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.