महिलांच्या टी-२० सामन्यात महाराष्ट्राची विजयी सलामी

ईश्वरी सावकारचे प्रभावी नेतृत्व: मिझोराम,केरळवर सहज विजय

नाशिक-. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआयतर्फे आयोजित चंदिगड येथे १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेतील मिझोराम व केरळ विरुद्ध असे पहिले दोन्ही सामने जिंकले. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत विजयी सुरुवात केली

पहिल्याच सामन्यात महाराष्ट्र संघाने मिझोराम वर ९३ धावांनी दणदणीत विजय मिळविला . ईश्वरी सावकारने सलामीला येत केवळ ३९ चेंडूत ६ चौकारांसह ४० धावांचे जोरदार योगदान दिले. कर्णधारपद निभावताना संघातर्फे सर्वाधिक धावा केल्या. तेराव्या षटकात ईश्वरी धावबाद झाली तेव्हा संघाची धावसंख्या ९३ पर्यन्त नेऊन ठेवली होती. विजयासाठी १३२ धावांचा पाठलाग करताना मिझोरामला महाराष्ट्र संघाने केवळ ३८ धावात गुंडाळले. दुसर्‍या सामन्यात केरळ वर ११ धावांनी विजय मिळवतानाही ईश्वरीने ५ चौकारांसह सर्वाधिक ४१ धावा केल्या. महाराष्ट्र संघाने ४ बाद ९७ ची मजल मारली व केरळ ला ८६ धावात रोखले.

बीसीसीआयची १९ वर्षांखालील महिला टी-ट्वेंटी स्पर्धा :

संक्षिप्त धावफलक व निकाल :

महाराष्ट्र वि मिझोराम – मिझोराम ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले .

महाराष्ट्र – २० षटकांत ५ बाद १३१ – ईश्वरी सावकार ४०, श्वेता सावंत २८. वि.

मिझोराम – १६.४ षटकांत सर्वबाद ३८. इशिता खळे ३ बळी.

महाराष्ट्र ९३ धावांनी विजयी.

महाराष्ट्र वि केरळ – केरळ ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले .

महाराष्ट्र – २० षटकांत ४ बाद ९७ – ईश्वरी सावकार ४१. के एन मुल्ला नाबाद २५. वि.

केरळ – २० षटकांत सर्वबाद ८६. के एन मुल्ला ३ तर समृद्धि बनवणे व इशिता खळे प्रत्येकी २ बळी.

महाराष्ट्र ११ धावांनी विजयी.

——————

महाराष्ट्राचे एफ गटातील बाकीचे सामने पुढील प्रमाणे-

४ ऑक्टोबर – वडोदरा , ६ ऑक्टोबर – माणिपूर व ८ ऑक्टोबर – हरयाणा.

Leave a Reply

Your email address will not be published.

X