७ सामन्यात २० बळी नोंदवत सर्वीत्तम कामगिरी : इतर तीन गोलंदाजांसह सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत समावेश

नाशिक- डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघातर्फे २०२२-२३ या रणजी ट्रॉफी हंगामात देखील पुन्हा एकदा लक्षणीय कामगिरी केली. रणजी ट्रॉफी स्पर्धेत नुकत्याच पार पडलेल्या साखळी स्पर्धेत ७ सामन्यात २० बळी घेतले व इतर तीन गोलंदाजांसह सर्वाधिक बळी घेत घेणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळविले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित २०२२-२३ या रणजी ट्रॉफी हंगामातील साखळी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे सामने १३ डिसेंबर २०२२ ते २७ जानेवारी २०२३ दरम्यान विविध ठिकाणी पार पडले. एलिट ब गटात महाराष्ट्राबरोबर दिल्ली , सौराष्ट्र , आंध्र , आसाम , तामिळनाडू , हैद्राबाद व मुंबई संघांचा समावेश होता. सत्यजित बच्छावने एकूण ७ सामन्यातील ११ डावांत २५१.२ षटकांत ३९ निर्धाव षटके टाकत २० बळी घेतले. यात षटकामागे केवळ ३.११ धावांची सरासरी राखली.

या दरम्यान १९ धावांत ३ बळी अशी एका डावातील सर्वोत्तम कामगिरी करताना आंध्रवर १३१ धावांनी विजय मिळवला. तर आसाम विरुद्ध १८९ धावांत ५ बळी अशी पूर्ण सामन्यातील या रणजी ट्रॉफी हंगामातील वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. याप्रकारे एलिट ब गटात सौराष्ट्र व आंध्र पाठोपाठ , बलाढ्य मुंबई संघाच्या वरचे तिसरे स्थान मिळवण्यात सत्यजितने महाराष्ट्र संघातर्फे आपला वाटा उचलला. या सात सामन्यात महाराष्ट्र संघाने तीन विजय मिळवले ,तर ४ सामने अनिर्णित राहिले. शेवटच्या साखळी सामन्यात मुंबईविरुद्धच्या रोमांचक सामन्यात दोन्ही डावात प्रत्येकी २ बळी मिळवले. पहिल्या डावातील दोन बळींमुळे महाराष्ट्र व मुंबई या दोन्ही संघांचा पहिला डाव ३८४ धावावर संपला , त्यामुळे कोणालाच पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवता आले नाहीत. पण महाराष्ट्र संघाची बाद फेरीतील प्रवेश करण्याची संधी थोडक्यात हुकली. दुसऱ्या डावात मुंबई संघाने निर्णायक विजयासाठी अतिशय निकराचे प्रयत्न केले. पण या सामन्यातील चौथ्या व अखेरच्या डावात सत्यजितने महाराष्ट्र संघा तर्फे गोलंदाजीची सुरवात करत एका बाजूने उरलेल्या निर्धारित वेळेत एकूण २७.३ मधील १३.३ षटके टाकत २ बळी मिळवत मुंबईला निर्णायक विजया पासून रोखले.
सत्यजितच्या महाराष्ट्र संघासाठीच्या ह्या प्रभावी कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून यापुढील कारकीर्दीतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.