
नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या डावखुरया सलामीवीर साहिल पारखने बी सी सी आय च्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्र संघाच्या सिक्कीम संघावरील विजयात नाबाद २२४ धावांचे योगदान दिले. सुरत येथे खेळल्या जात असलेल्या बी सी सी आय च्या विजय मर्चंट ट्रॉफीत साहिल पारखने केवळ १४९ चेंडूत ३५ चौकार व ४ षटकारांसह तूफान फटकेबाजी करत नाबाद २२४ धावा केल्या.
महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून सिक्कीमला प्रथम फलंदाजी देत त्यांचा पहिला डाव केवळ ७२ धावांत गुंडाळला. उत्तरादाखल सलामीवीर साहिल पारखच्या नाबाद २२४ धावांच्या जोरावर महाराष्ट्र संघाने २ बाद ३५१ धावांवर डाव घोषित केला. दुसऱ्या डावातहि सिक्कीमला परत ५७ धावांत बाद करत महाराष्ट्र संघाने एक डाव व २२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या बी सी सी आय च्या स्पर्धेत नाशिकच्या साहिल पारख व दिर्घ ब्रम्हेचा या दोघांनीहि महाराष्ट्र संघातर्फे फलंदाजीत प्रभावी कामगिरी केली आहे.

महाराष्ट्र संघाचा पुढील साखळी सामना आसाम बरोबर २१ डिसेंबरला होणार आहे.साहिल पारख या उदयोन्मुख कुमार क्रिकेट खेळाडूच्या धमाकेदार कामगिरी बद्दल , सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी साहिल पारख ला शाबासकी देत , खास अभिनंदन करून पुढील अशाच जोरदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.