सौराष्ट्रास विजेतेपद: सत्यजित बच्छावची सातत्यपूर्ण कामगिरी, रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या नव्या हंगामासाठी सज्ज
नाशिक- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ( बीसीसीआय) च्या विजय हजारे ट्रॉफीत नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने सुरवातीच्या साखळी सामन्यांपासून अंतिम फेरी पर्यंत आपल्या डावखुरया फिरकी गोलंदाजीने वेळोवेळी महत्वपूर्ण बळी घेत महाराष्ट्र संघाला विजयी करत, अंतिम फेरीत पोहचवण्यात मोठा वाटा उचलला. नुकत्याच अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने विजेतेपद पटकावले.

सत्यजितची साखळी सामन्यातील सर्वात जोरदार कामगिरी म्हणजे अजिंक्य रहाणे , पृथ्वी शॉ , यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर व सर्फराज खान यांच्या बलाढ्य मुंबई संघाविरुद्धच्या विजयात टिपलेले ६ बळी. रांची येथे झालेल्या इतर साखळी सामन्यात सत्यजितने रेल्वे, बंगाल व मिजोराम विरुद्ध प्रत्येकी १ तर पोंडेचरी विरुद्ध २ बळी घेतले. त्यानंतर अहमदाबाद येथे झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेश विरुद्ध २ , उपांत्य सामन्यात आसाम विरुद्ध १ असे , तर अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाचा १ गडी बाद केला. याप्रमाणे विजय हजारे ट्रॉफीत एकूण १५ बळी घेतले. याबरोबरच उपांत्यपूर्व सामन्यापासून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. यात उपांत्य सामन्यात आसाम विरुद्ध ४१ व अंतिम सामन्यात सौराष्ट्र विरुद्ध २७ धावा करताना अष्टपैलू चमक दाखवली.

आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर गेल्या काही वर्षांपासून सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा अतिशय महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. १३ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या नव्या हंगामकरिता सत्यजित पूर्णपणे सज्ज झाला आहे. महाराष्ट्र संघाचा पहिला सामना दिल्ली बरोबर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुनजे , पुणे येथे सुरू होत आहे. त्यामुळे नाशिककर क्रिकेट प्रेमींचे पुनः एकदा सत्यजित कडून भरीव कामगिरीच्या अपेक्षांसह २०२२-२३ हंगामातील रणजी ट्रॉफी स्पर्धेकडे बारकाईने लक्ष असेल.नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे आदींनी सत्यजितचे अभिनंदन करत त्याला शुभेच्छा दिल्या.