शेखर गवळी स्मृती टि-२० स्पर्धेस उत्साहात सुरवात

स्थानिक क्रिकेटपटूंना चालना देण्याचा प्रयत्न- १६ संघाचा सहभाग, शनिवारी अंतिम सामना

नाशिक- नाशिकचे प्रसिध्द क्रिकेटपटू कै.शेखर गवळी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व राम लखन क्रीडा सांस्कृतिक मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरवात झाली. सलामीच्या सामन्यात नाशिक जिमखाना, जंबो एव्हरशाईन,एनएएसएफ या संघांनी आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करत विजय नोंदवले.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, मैदानावर कै. शेखर गवळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ स्पर्धेच्या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार श्री वसंतभाऊ गीते यांचे शुभहस्ते व प्रथमेश गीते, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद ( धनपाल ) शहा, सचिव समीर रकटे , राम लखन क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दशरथ लोखंडे, संजय परिडा , बाळासाहेब मंडलिक, नगरसेवक योगेश मुन्ना हिरे , नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन निवड समिति सदस्य सतिश गायकवाड , पदाधिकारी अनिरुद्ध भांडारकर , राजू आहेर, डॉ. भूषण नेमाडे या व इतर संबंधित यांच्या उपस्थितित झाला.

या स्पर्धेत १६ निवडक संघात १० डिसेंबर पर्यंत पाच दिवस या पांढऱ्या क्रिकेट चेंडूवरील टी-ट्वेंटी सामने रंगणार आहेत. नाशिकमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावरील पारितोषिक रकमेची क्रिकेट चेंडूवरील स्पर्धा ,नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन संलग्न राम लखन क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे आयोजित करण्यात येत आहे. विजेतेपदासाठी रुपये एक लाख एक हजार व उपविजेत्या संघाला एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन संलग्न राम लखन क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने संजय परिडा , बाळासाहेब मंडलिक व अर्थातच एन डी सी ए चे सचिव समीर रकटे आयोजक आहेत.

शेखर गवळी यांची उणीव भासली

या भव्य टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेच्या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार श्री वसंतभाऊ गीते व प्रथमेश गीते आहेत. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे रणजीपटू लेगस्पिनर कै. शेखर गवळी हे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे फिजिकल ट्रेनर म्हणून जबाबदारी पार पाडत होते, त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या विशेष स्पर्धेचे आयोजन असेल. हे या स्पर्धेचे शुभारंभाचे वर्ष असून दरवर्षी नियमितपणे यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर हि कै. शेखर गवळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धा खेळवण्याचा आयोजकांचा मानस आहे.

आज पहिल्या दिवशी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब, मैदानावर नाशिक जिमखाना व जंबो संघांनी तर महात्मनागर क्रिकेट मैदानावारएन एस एफ ए व अद्वैत क्रिकेट अकादमीने आपले सामने जिंकून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

नाशिक जिमखाना,जंबो एव्हरशाईनचे विजय

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब वर पहिल्या सामन्यात नाशिक जिमखानाने क्रीडाकला मंडळाला प्रथम फलंदाजी देत ११२ धावांत रोखले ते सत्यजित बच्छाव व महेश डावरे यांच्या प्रत्येकी ३ बळींमुळे त्यात इंद्रजीत साळवे ने सर्वाधिक ४४ धावा केल्या. त्यानंतर केवळ ११.१ षटकांत सत्यजित बच्छावच्या नाबाद ५७ व यासर शेखच्या नाबाद ३९ धावांच्या जोरावर ९ गडी राखून मात केली. रणजीपटू सत्यजित बच्छावने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. दुसऱ्या सामन्यात जंबोने एव्हरशाईनला प्रथम फलंदाजी देत १२४ धावांत रोखले, नीलेश सिंग ठाकूर ने सर्वाधिक ५८ धावा केल्या. विजया साठीच्या १२५ धावा १४.५ षटकांत पार केल्या त्या योगेश राजदेवच्या फटकेबाज ६३ धावांच्या जोरावर.

एनएसएफ, ग्रीफीनचे सफाईदार विजय

महात्मनागर क्रिकेट मैदानावार पहिल्या सामन्यात एन एस एफ एने प्रथम फलंदाजी करत मालेगाव विरुद्ध १५३ धावा केल्या त्यात प्रतिक देवरे ४० , नीलकंठ तनपुरे ३७ तर प्रतिक भालेराव ने नाबाद ३५ धावा केल्या. नंतर प्रतिक भालेरावने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करताना मालेगावचे ४ गडी बाद केले, प्रतिक देवरेनेही २ बळी घेत साथ दिल्याने एन एस एफ एने मालेगाव ला ७२ धावांत रोखत ८१ धावांनी मोठा विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात ग्रिफिनने प्रथम फलंदाजी करत १२१ पर्यंत मजल मारली. सागर लभडेने सर्वाधिक ३२ धावा केल्या. अद्वैतच्या प्रथमेश कसबेने ३ गडी बाद केले. उत्तरादाखल तनय कुमारच्या नाबाद ४५ व सूरज पांडेच्या नाबाद ३७ धावांच्या जोरावर १८ व्या षटकात ७ गडी राखून विजय मिळवला.

पांढरा चेंडू,रंगीत गणवेश आकर्षाणाचा केंद्रबिंदू

कै. शेखर गवळी मेमोरियल स्पर्धा पांढऱ्या क्रिकेट चेंडूवर खेळली जात असून सर्व खेळाडू रंगीत पोषाखात असतील . खेळाडूंना रंगीत पोषाख आयोजकांतर्फे मिळाला आहे. तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन रणजी ट्रॉफी आयोजित सामन्याप्रमाणे खेळाडूंसाठी खास अल्पोपहार व भोजन व्यवस्था आयोजकांतर्फे पुरवण्यात येत आहे. .सांघिक पारितोषिक याबरोबरच मालिकावीर अकरा हजार तर उत्कृष्ट फलंदाज , उत्कृष्ट गोलंदाज , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट यष्टिरक्षक यांना देखील प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे चमकदार वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या क्रिकेटपटूंना आयोजकातर्फे खास बक्षिसे ठेवली आहेत. एकूण १६ संघांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना १० डिसेंबरला रंगेल. सर्व नाशिककर क्रीडारसिक , क्रिकेटप्रेमींनी या रंगतदार क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यावा असे जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

X