शेखर गवळी स्मृती स्पर्धेत नाशिक जिमखाना अजिंक्य

एनसीएवर ७५ धावांनी मात : यासर शेखला मालिकावीराचा किताब,शेरीकर उत्कृष्ठ फलंदाज,अमित गवांदेला उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाचा मान

नाशिक- .कै. शेखर गवळी मेमोरियल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नाशिक जिमखाना संघाने एन सी एवर ७५ धावांनी मात करून विजेतेपद पटकावले. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन- एन डी सी ए – व राम लखन क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर हा अंतिम सामना झाला. सामन्यानंतर या संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार वसंतभाऊ गीते व प्रथमेश गीते यांसह विलासभाऊ लोणारी आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. मीरा आजी फाउंडेशनचे अद्वैत व कृष्णा गोसावी, रंजन ठाकरे, नरेंद्र छाजेड , राजाभाऊ भागवत , दीपक चव्हाण ,श्रीमती दीप्ती शेखर गवळी ,करण लांबा , नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद ( धनपाल ) शहा, पदाधिकारी, राजू आहेर, राम लखन क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दशरथ लोखंडे, संजय परिडा , बाळासाहेब मंडलिक,गणेश गायकवाड , संदीप सेनभक्त, सर्वेश देशमुख, प्रल्हाद सूर्यवंशी ,राजू गोसावी आदी यावेळी उपस्थित होते. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे यांनी सुत्रसंचालन करत आभार मानले.

विविध पारितोषिकांची खैरात, कामगिरीची योग्य दखल

विजेतेपदासाठीचे रुपये एक लाख एक हजार नाशिक जिमखानाला व उपविजेत्या एन सी ए संघाला एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. या सांघिक पारितोषिकांबरोबरच मालिकावीर अकरा हजार यासर शेख, तर उत्कृष्ट फलंदाज श्रीकांत शेरीकर, उत्कृष्ट गोलंदाज अमित गवांदे , उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विकास वाघमारे ,व उत्कृष्ट यष्टिरक्षक मोहित नेगी यांना देखील प्रत्येकी पाच हजार रुपये व चषक अशी वैयक्तिक पारितोषिके मिळाली. दरवर्षी नियमितपणे यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर हि कै. शेखर गवळी मेमोरियल क्रिकेट स्पर्धा खेळवण्याचा आयोजकांचा मानस आहे.

अंतिम सामन्यात नाशिक जिमखानाने एन सी ए विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १९१ धावसंख्या उभारली ती मुख्यत: श्रीकांत शेरीकरच्या फटकेबाज ८८ धावांच्या जोरावर. त्यास कपिल शिरसाट ३८ व विकास वाघमारे ३१ यांची साथ मिळाली. एन सी ए च्या कोणत्याच गोलंदाजाचा विशेष प्रभाव पडला नाही. उत्तरादाखल एन सी ए च्या डावाची २ बाद १४ अशी खराब सुरुवात झाल्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेले व १७.४ षटकांत ११६ धावांत त्यांचा डाव संपला.

एन सी ए तर्फे श्रीरंग कापसे ने सर्वाधिक २३ धावा केल्या. नाशिक जिमखानाच्या कर्णधार यासर शेख , समद अत्तार व तन्मय शिरोडे यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करताना यासरने ३ तर समद व तन्मयने प्रत्येकी २ बळी टिपत संघाला ७५ धावांनी मोठा विजय मिळवून दिला.

चाळीस हजारपेक्षा दर्शकांची पसंती

नाशिककर क्रीडारसिक , क्रिकेटप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर या रंगतदार क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतला. तसेच ४०,००० पेक्षा जास्त दर्शकांनी यू ट्यूब वरील थेट प्रक्षेपणाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X