बीसीसीआयच्या विजय हजारे ट्रॉफीत: सहा बळी मिळवत चमकदार कामगिरी

नाशिक- भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या विजय हजारे ट्रॉफीत रांची येथील सामन्यात नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने अफलातून कामगिरी करत अजिंक्य रहाणे , पृथ्वी शॉ , यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर व सर्फराज खान यांच्या बलाढ्य मुंबई संघाविरुद्ध तब्बल सहा बळी घेतले. सत्यजितच्या या चमकदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघाला दणदणीत विजय नोंदवता आला.
विजय हजारे एकदिवसीय मर्यादित ५० षटकांच्या स्पर्धेत सत्यजित बच्छावच्या भेदक गोलंदाजी मुळे महाराष्ट्राने मुंबईवर २१ धावांनी मात केली. सत्यजित बच्छाव : १० षटके ४६ धावा व ६ बळी,अशी विजय हजारे स्पर्धेतील आपली सर्वोत्तम कामगिरी केली.
नाणेफेक जिंकुन महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत २ बाद ३४२ अशी धावसंख्या उभारली, ती सलामीवीर राहुल त्रिपाठीच्या १३७ चेंडुंतील १८ चौकार व २ षटकारांच्या सहाय्याने केलेल्या दणदणीत नाबाद १५६ धावांच्या जोरावर. त्याला पवन शाह ८४ व अझीम काझी नाबाद ५० यांची साथ मिळाली. उत्तरादाखल मुंबई संघाच्या १ बाद ६४ नंतर शतकवीर जयस्वाल व अरमान जाफरने १५४ पर्यन्त ९० धावांची केलेली महत्वपूर्ण व धोकादायक भागीदारी सत्यजित बच्छावने अरमान जाफरला ३६ वर बाद करून संपवली .नंतर २१३ वर हंगर्गेकरने अजिंक्य राहणेला ३१ वर बाद केले. ३ बाद २१३. नंतर सत्यजित बच्छावच्या फिरकीने धुमाकूळ घातला. सर्फराज खान हा गेल्या दोन हंगामातील सर्वाधिक यशस्वी मुंबईचा फलंदाज सत्यजितने २३ धावांवर बाद केला – मुंबई ४ बाद २६१ – व मुंबईच्या एकापाठोपाठ तब्बल ५ फलंदाजांना तंबूत पाठविले. मुंबईची धावसंख्या २८६ असताना एस एम काझी ने यशस्वी जयस्वालला १४२ धावांवर बाद केले . मुंबईचा दुसरा कोणताही फलंदाज सत्यजित बच्छावच्या भेदक फिरकीसमोर टिकू शकला नाही . ठराविक अंतराने सत्यजितने मुंबईचे फलंदाज तंबूत पाठविले आणि ४९ षटकांत ३२१ धावात मुंबईला गुंडाळून महाराष्ट्र संघाला २१ धावांनी विजयी केले. याधीच्या बंगाल व रेल्वे वरील विजयांत आपल्या काटकसरीपूर्ण गोलंदाजीने एक एक गडी बाद करत सत्याने ( क्रिकेट वर्तुळात सत्यजित याच नावाने प्रसिद्ध आहे ) महाराष्ट्र संघाच्या विजयांना हातभार लावला होता.

कामगिरीतील सातत्य कायम
आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर गेल्या काही वर्षांपासून सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. रणजी स्पर्धे बरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तीनही प्रकारात सत्यजित महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता याआधीच्या हंगामा अखेर २८ सामन्यांत सत्यजित बच्छाव ने महाराष्ट्र संघातर्फे ५१ बळी घेतले आहेत. भेदक गोलंदाजी बरोबर खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीने देखील संघाच्या धावसंख्येत सत्यजित वेळेवेळी आपला वाटा उचलत असतो .
शिबीरासाठी खास निमंत्रित
राष्ट्रीय पातळीवरील अशा सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच गेल्या दोन हंगामापासून आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत सत्यजितचा समावेश झाला होता. आय पी एल लिलावात, २० लाख इतकी कमीतकमी बोली किंमत मिळणार्या खेळाडुंच्या , आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात समाविष्ट होता. त्याबरोबरच आय पी एल २०२२ च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स – सी एस के – तर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती . सत्यजितला चेन्नई सुपर किंग्स ने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणुन संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते.विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाचे बाकीचे सामने पुढीलप्रमाणे – १९ नोव्हेंबर – सेनादल , २१ नोव्हेंबर – मीझोराम, २३ नोव्हेंबर – पोंडेचरी.
नाशिककर सत्यजित बच्छावच्या या अफलातून कामगिरीमुळे नाशिक जिल्हा क्रीडा व क्रिकेट क्षेत्रात अतिशय जल्लोषाचे वातावरण आहे . नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघटनेच्या अंनेक संबधितांनी सत्यजितचे खास अभिनंदन करून विजय हजारे स्पर्धेतील उर्वरित सामन्यांतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.