नाशिक- नाशिकचा आघाडीचा रणजीपटू , गेल्या काही हंगामापासून महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याने दिललीविरुद्ध च्या सामन्यात पुणे येथे रणजी ट्रॉफीच्या सामन्यात बळींचे शतक पूर्ण केले.

महाराष्ट्र संघातर्फे खेळत असा पराक्रम करणारा सत्यजित हा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. समरजीत सिंग यास बाद करून हा टप्पा पूर्ण केला. २७ सामन्यातील ४७ डावात त्याने हे यश मिळवले. एका सामन्यात ११ तर एक डावात ८ बळी हि त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याबरोबरच ४ वेळा डावात ५ तर ६ वेळा डावात ४ गडी टिपण्याची कामगिरी सत्यजितने केली आहे.दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र संघाने ९ गडी राखून विजय मिळवला . त्यात सत्यजित बच्छावने दुसऱ्या डावात १ बळी घेत हा टप्पा पूर्ण केला.

राष्ट्रीय पातळीवरील अशा सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच गेल्या दोन हंगामापासून आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत सत्यजितचा समावेश झाला होता. आय पी एल लिलावात, २० लाख इतकी कमीतकमी बोली किंमत मिळणार्या खेळाडुंच्या , आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात समाविष्ट होता. त्याबरोबरच आय पी एल २०२२ च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स – सी एस के – तर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती . सत्यजितला चेन्नई सुपर किंग्स ने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणुन संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते.

या कामगिरीमुळे सत्यजितचे सर्वत्र कौतुक होत असून नाशिक क्रिकेट वर्तुळात अतिशय उत्साहाचे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी सत्यजितला शाबासकी देत खास अभिनंदन करून पुढील अशाच जोरदार कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.