जानेवारीत होणार राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धाः निव़डीने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण

नाशिक- नाशिकचा आघाडीचा क्रिकेटपटू पवन सानप याची २५ वर्षांखालील वयोगटात महाराष्ट्र संघात निवड झाली आहे . भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय तर्फे आयोजित जानेवारी मध्ये विविध ठिकाणी होणार्या राष्ट्रीय पातळीवरील कर्नल सी के नायडू करंडक स्पर्धेसाठी ही निवड झाली आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या विविध स्पर्धात पवन सानप आपल्या डावखुरया जलदगती गोलंदाजीने बळी घेत छाप पाडत असतो. एम सी ए – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – च्या निवड चाचणी सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीमुळे हि निवड झाली . सदर कर्नल सी के नायडू ट्रॉफी स्पर्धेचे चार दिवसीय साखळी सामने १ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान सोलापूर , भिलाई, आणंद, चांदिगड व पुणे येथे खेळविले जाणार आहेत . पवनच्या महाराष्ट्र संघातील या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पवनचे अभिनंदन करून स्पर्धेतील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे सामने पुढील प्रमाणे होणार आहेत – १ जानेवारी – गोवा, ८ जानेवारी – छत्तीसगड, १५ जानेवारी -अरुणाचल प्रदेश, २२ जानेवारी – बिहार , २९ जानेवारी – गुजराथ ,५ फेब्रुवारी – चांदिगड १२ फेब्रुवारी – आंध्र .