सर्वीत्तम कामगिरीची घेतली दखलः रांची येथे महाराष्ट्राचे साखळी सामने
नाशिक- नाशिकचा आघाडीचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याची बीसीसीआयतर्फे होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघात पुन्हा वर्णी लागली आहे.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेसाठी नुकताच राज्य संघात निवड करण्यात आला. प्रथम श्रेणी क्रिकेटची अतिशय महत्त्वाची ही एकदिवसीय मर्यादित ५० षटकांची स्पर्धा, नियमितपणे दरवर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ( बीसीसीआय) तर्फे आयोजित करण्यात येते. त्यात १२ ते २३ नोव्हेंबर दरम्यान रांची येथे महाराष्ट्र संघाचे साखळी सामने होणार आहेत.

आतापर्यंतच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे. रणजी स्पर्धे बरोबरच सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी तसेच एकदिवसीय विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा या तीनही प्रकारात सत्यजित गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता याआधीच्या २८ सामन्यांत सत्यजित बच्छाव ने महाराष्ट्र संघातर्फे ५१ बळी घेतले आहेत. भेदक गोलंदाजी बरोबर खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीने देखील संघाच्या धावसंख्येत सत्यजित वेळेवेळी आपला वाटा उचलत असतो .
सातत्यपूर्ण कामगिरीने उंचावले मनोबल
राष्ट्रीय पातळीवरील अशा सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच गेल्या दोन हंगामापासून आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत सत्यजितचा समावेश झाला होता. आय पी एल लिलावात, २० लाख इतकी कमीतकमी बोली किंमत मिळणार्या खेळाडुंच्या , आतापर्यंत प्रतिनिधित्व न केलेल्या गटात समाविष्ट होता. त्याबरोबरच आय पी एल २०२२ च्या हंगामासाठी महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स – सी एस के – तर्फे संघाच्या शिबिरासाठी निवड झाली होती . सत्यजितला चेन्नई सुपर किंग्स ने गोलंदाजी विशेषज्ञ म्हणुन संघाच्या शिबिरात खास निमंत्रित केले होते.

सत्यजितच्या महाराष्ट्र संघातील या निवडीमुळे नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्यजितचे अभिनंदन करून विजय हजारे स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघाचे सामने पुढीलप्रमाणे १२ नोव्हेंबर – रेल्वे , १५ नोव्हेंबर – बंगाल , १७ नोव्हेंबर – मुंबई ,
१९ नोव्हेंबर – सेनादल , २१ नोव्हेंबर – मीझोराम, २३ नोव्हेंबर – पोंडेचरी.