एन डी सी ए, नाशिक जिमखान्याची आगेकूच

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी: भूषण भामरे, हर्षद कोल्हे,सागर लभडे,हर्षसिंगची भेदक गोलंदाजी

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर आठव्या दिवशी एन डी सी ए नून व नाशिक जिमखाना यांनी आपले पहिले सामने जिंकत आगेकूच केली आहे.

पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून पंचवटी क्रिकेट क्लबने प्रथम फलंदाजी घेतली पण एन डी सी ए नूनच्या गोलंदाजांनी त्यांना केवळ ७६ धावात रोखले. एन डी सी ए नूनच्या भूषण भामरे व हर्षद कोल्हेने प्रत्येकी ३ तर ऋतुराज ठाकरेने २ व मोहम्मद कासिम ने १ बळी घेतला. एन डी सी ए नूनने विजयासाठीच्या ७७ धावा मोहम्मद कासिमच्या नाबाद ३७ व सुमित मौर्य च्या २६ धावांच्या जोरावर केवळ २ गडी गमावून पार केल्या व ८ गडी राखून विजय मिळवला.

नाशिक जिमखान्याचे वर्चस्व

दुसऱ्या सामन्यात नाशिक जिमखानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत कृष्णा क्रिकेट अकादमी विरुद्ध २९२ धावा केल्या. कपिल शिरसाठ व रोहित परबने प्रत्येकी ५५ तर महेश डावरेने ५३ धावा केल्या. कृष्णा क्रिकेट अकादमीच्या सागर लभडे ने ४ तर हर्ष सिंग ने ३ बळी घेतले. विजायासाठीच्या २९३ धावांचा पाठलाग करतांना कर्णधार सागर लभडेच्या फटकेबाज १०२ व साहिल चव्हाणच्या ९४ धावांनंतरही कृष्णा क्रिकेट अकादमी २५८ पर्यंतच मजल मारू शकली. रोहित परबने ५ तर यासर शेखने ३ बळी घेत नाशिक जिमखानाला ३४ धावांनी विजयी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

X