हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी ( १६ वर्षांखालील ): अनिरूध्द सजगुरेची चमक,विरेन दंदणे,गुलाब बनी,गणेश जाधवची उत्कृष्ठ कामगिरी

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत, १६ वर्षांखालील वयोगटातील हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीचे विजेतेपद बोराडे ११ संघाने मिळवले. एस एस के मैदानावर झालेल्या ४५ षटकांच्या सामन्यात बोराडे ११ संघाने यश क्रिकेट अकादमी वर ७ गडी राखून मोठा विजय मिळवत हि स्पर्धा जिंकली.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या यश क्रिकेट अकादमीचा डाव बोराडे ११ च्या गोलंदाजांसमोर ३५ .२ षटकांत ८० धावांत संपला. यशच्या विरेन दंदणेने सर्वाधिक २६ , कुणाल घुगेने १६ व रायन वासवानीने ११ धावा केल्या. बोराडे ११ च्या अनिरुद्ध सजगुरेने ४, रोहित गिरीने ३ , आर्यन कापसेने २ व गणेश जाधवने १ गडी बाद केला. विजयासाठीच्या ८१ धावा बोराडे ११ ने ३ गडी गमावून २१ .१ षटकांत पार केल्या. यशच्या श्रवण चंद्रात्रेने २ तर श्रवण शिंदेने १ गडी बाद केला. बोराडे ११ च्या अनिरुद्ध सजगुरेने फलंदाजीतही चमक दाखवत नाबाद २२ धावा केल्या. त्यास गुलाम नबी घोसीने १३ व कर्णधार गणेश जाधवने नाबाद १२ धावा करून साथ देत ७ गडी राखून संघाला विजयी केले. विजयी संघाला प्रशिक्षक सोनू बोराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
संघाची चुरशीची कामगिरी
या हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेत १६ वर्षांखालील वयोगटात ८ गटातील २४ संघांत एकूण ३५ सामने खेळवण्यात आले. फलंदाजीत द्वारकाच्या समकीत सुराणाने ३ सामन्यात सर्वाधिक ३२० धावा फटकावल्या. तर गोलंदाजीत आर व्ही स्पोर्ट्सच्या यत्नेश संधानने ३ सामन्यात सर्वाधिक १५ बळी घेत चमक दाखवली .