आमंत्रिताच्या क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावत नोंदवली सरस कामगिरी: घरच्या मैदानावर रंगला सोहळा,विशेष पारितोषिकांची घोषणा

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या क्रिकेट ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग ) स्पर्धेचे , विजेतेपद नाशिक संघाने रणजीपटू सत्यजित बच्छावच्या नेतृत्वाखाली मिळविले. या दैदीप्यमान कामगिरीच्या निमित्ताने नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे संघातील कर्णधार व सर्व खेळाडूंचा आज खास सत्कार करण्यात आला.
माजी अध्यक्ष विलासभाऊ लोणारी यांच्या हस्ते हुतात्मा अंनत कान्हेरे मैदान , गोल्फ क्लब येथे हा सोहळा झाला. यावेळी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विजेत्या संघास एक लाख अकरा हजार रुपयांचे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. व्यासपीठावर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे , जॉइंट सेक्रेटरी योगेश ( मुन्ना ) हिरे , क्रिकेट ऑपरेशन कमिटीचे मुख्य राजेंद्र लेले उपस्थित होते. त्याबरोबरच निवड समिति सदस्य सतीश गायकवाड, फैय्याज गंजीफ्रॉकवाला, तरुण गुप्ता, प्रशिक्षक शांताराम मेणे, फिजिकल ट्रेनर विनोद यादव यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन विनोद शहा, राजेंद्र लेले व तरुण गुप्ता यांनी खेळाडूंचे अभिनंदन करतानाच भविष्यासाठी मार्गदर्शनहि केले. संघ व खेळाडूंच्या वतीने कर्णधार सत्यजित बच्छाव व स्पर्धेतील सर्वात यशस्वी फलंदाज सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने मनोगत व्यक्त केले. या विशेष सोहळ्यास , नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी संजय परिडा, बाळू मंडलिक, राजू आहेर, माजी पदाधिकारी रमेश वैद्य , दीपक केळकर, जेष्ठ पत्रकार दीपक ओढेकर , श्रीकृष्ण कुलकर्णी , एन डी सी ए चे रतन कुयटे , मंगेश शिरसाट , सर्वेश देशमुख , संदीप सेनभक्त व क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.