एस एम बी टी मान्सुन लीग:१९ वर्षां खालील स्पर्धा ,सलामीवीर साहिल पारखच्या घणाघाती ७६ धावा,आठ गडी राखून विजयश्री

नाशिक- नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, एस एम बी टी मान्सुन लीग २०२२-२३ ( १९ वर्षे वयोगट ) स्पर्धेचे विजेतेपद नासिक क्रिकेट अकादमी – एन सी ए – ने पटकावले. महात्मनगर क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात नाशिक जिमखानावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना नाशिक जिमखानाने ३७.५ षटकांत सर्वबाद १२१ धावा केल्या. सलामीवीर कर्णधार यश पगारच्या ६४ धावा सोडल्यास एकही फलंदाज टिकला नाही. एन सी एच्या रोहन शेडगेने ३ , केतन टिळे व गौरव कुलकर्णीने प्रत्येकी २ तर प्रतीक तिवारी व विवेक यादवने प्रत्येकी १ गडी बाद केला. विजयासाठीच्या १२२ धावा सलामीवीर साहिल पारखच्या घणाघाती नाबाद ७६ धावांच्या जोरावर १७.२ षटकांत २ गडी गमावून पार करत एन सी एने ८ गडी राखून मोठ्या विजयासह विजेतेपद आपल्याकडेच राखले.