हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी : द्वारका क्रिकेट अकादमीवर एक धावांनी मात,रोहन शेंडगे विजयाचा मानकरी, मोहम्मद ट्रंकवालाची एकाकी झुंज अपयशी

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी च्या १९ वर्षांखालील स्पर्धेचे विजेतेपद अतिशय चुरशीच्या अंतिम लढतीत नासिक क्रिकेट अकादमीने द्वारका क्रिकेट अकादमीवर केवळ एक धावेने मात करत पटकवले. ६ बळी घेणारा नासिक क्रिकेट अकादमीचा डावखुरा जलदगती गोलंदाज रोहन शेडगे हा विजयाचा खरा मानकरी ठरला तर . द्वारका क्रिकेट अकादमीच्या डावखुरा सलामीवीर मोहम्मद ट्रंकवालाची शेवटपर्यंतची लढत अपयशी ठरली.
एम सी सी क्रिकेट मैदानावर झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात नाणेफेक जिंकून द्वारका क्रिकेट अकादमीने नासिक क्रिकेट अकादमीला प्रथम फलंदाजी दिली . नासिक क्रिकेट अकादमी ३६.१ षटकांत ११० धावांवर सर्वबाद झाले. समर्थ देशमुखने सर्वाधिक २५ धावा केल्या. द्वारकाच्या मुस्तानसिर कांचवाला व हर्षल काथेडने प्रत्येकी ३, समकीत सुराणाने २ व रोहित पुरोहितने १ बळी घेतला. उत्तरदाखल सलामीवीर मोहम्मद ट्रंकवालाला ४ बाद ११ वरुन समकीत सुराणा २५ व हिरालाल चनाराव २७ यांची साथ लाभल्याने द्वारकाने ६ बाद ८५ पर्यंत मजल मारली. तळाच्या फलंदाजांना बरोबर घेत विजयी होण्याचा मोहम्मद ट्रंकवालाचा झुंजार प्रयत्न शेवटी धावबाद झालयाने केवळ एका धावेने हुकला.
ट्रंकवालाची अखेरपर्यत झुंज
मोहम्मद ट्रंकवालाने सर्वाधिक ३६ धावा केल्या. नासिक क्रिकेट अकादमीचा डावखुरा जलदगती गोलंदाज रोहन शेडगेने आपल्या भेदक गोलंदाजीने ९ षटकांत १९ धावांत ६ बळी घेतले. त्यास विवेक यादवने २ व सुयश यादवने १ बळी घेत साथ दिल्याने अंतिम लढतीत नासिक क्रिकेट अकादमीने द्वारका क्रिकेट अकादमीवर १ धावेने विजय मिळवत १९ वर्षांखालील हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.