वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा- ऐश्वर्या वाघची प्रभावी गोलंदाजी, साक्षी-तेजस्वीनीची दमदार भागीदारी

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत नाशिकने सेक्रेटरी इलेव्हनवर १० गडी राखून दणदणीत विजयासह एकूण पाच संघांच्या अ गटाचे विजेतेपद मिळवत स्पर्धेत प्रथम स्थान मिळवले.
एम जी एम मैदान , छ. संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे खेळताना प्रथम फलंदाजी मिळालेल्या सेक्रेटरी ११ संघाविरुद्ध नाशिकच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत २० षटकांत ४ बाद ६३ इतकीच मजल मारून दिली. खास करून डावखुरी फिरकीपटू ऐश्वर्या वाघने ४ षटकांत केवळ ४ धावा देत ३ बळी घेत अतिशय प्रभावी कामगिरी केली. लक्ष्मी यादवने एक बळी घेतला. विजयासाठीच्या ६४ धावा सलामीवीर साक्षी कानडी व तेजस्विनी बाटवालच्या जोरदार भागीदारी च्या जोरावर नाशिकने अतिशय रुबाबात केवळ १४.५ षटकांत फटकावल्या. साक्षी २८ व तेजस्विनी २७ धावांवर नाबाद राहिल्या . साखळी स्पर्धेतील हा चौथा व शेवटचा सामना पावसाने प्रभावित मैदानामुळे एक दिवसीय ५० ऐवजी २० षटकांचा घेण्यात आला.
एमसीएब्लू विरूध्दचा सामना अनिर्णित
तिसरा नाशिक विरुद्ध एम सी ए ब्ल्यु सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता. त्या सामन्यात गरवारे मैदान , छ. संभाजी नगर ( औरंगाबाद ) येथे खेळताना प्रथम फलंदाजी करत नाशिकने सलामीवीर यष्टिरक्षक तेजस्विनी बाटवालच्या ५२ व रसिका शिंदेच्या महत्वपूर्ण नाबाद ५२ धावांच्या जोरावर, ५० षटकांत ९ बाद १७० धावा केल्या. आस्था संघवीने २० धावा केल्या. तेजस्विनी बाटवाल व आस्था संघवीने दुसऱ्या गड्यासाठी ८६ तर रसिका शिंदे व श्रुती गीते यांच्या आठव्या गड्यासाठी ५८ या दोन भागीदाऱ्यांमुळे नाशिकच्या धावसंख्येला आकार मिळाला. नाशिकचा डाव संपल्यानंतर जोरदार पावसामुळे उर्वरित खेळ होऊ शकला नाही व सामना अनिर्णित राहिला होता .
चार पैकी तीन सामने खिशात
या प्रकारे नाशिक महिला संघाने ४ पैकी ३ सामने – मेट्रो, अहमदनगर व सेक्रेटरी ११ – विरुद्धचे निर्णायकरित्या जिंकून या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवून उत्कृष्ट धावगती च्या आधारावर प्रथम स्थान मिळवले. एकूण स्पर्धेत नाशिक संघाने उत्कृष्ट सांघिक कामगिरी करतानाच , विशेष उल्लेखनीय फलंदाजीत कर्णधार प्रियांका घोडके ( ७ सामन्यातील ६ डावात १ शतक व १ अर्धशतकासह २४८ धावा ) , साक्षी कानडी ( ७ सामन्यातील ७ डावात १ अर्धशतकासह १९४ धावा ) , तेजस्विनी बाटवाल ( ७ सामन्यातील ७ डावात १ अर्धशतकासह १८७ धावा ) व उपकर्णधार रसिका शिंदेने ( ७ सामन्यातील ५ डावात १ अर्धशतकासह १५२ धावा ) अशी तर गोलंदाजीत ऐश्वर्या वाघ ( ५ डावात १३ बळी ) , माया सोनवणे ( ६ डावात १० बळी ) व प्रियांका घोडकेनेहि ( ६ डावात ८ बळी ) अशी अष्टपैलू छाप पाडत लक्षणीय कामगिरी केली. संघ प्रशिक्षकपदाची जबाबदारी भावना गवळी यांनी पार पाडली .
या राज्यस्तरीय स्पर्धेतील उज्ज्वल यशा बद्दल नाशिक क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी सर्व खेळाडुंचे खास अभिनंदन केले आहे
Keep it up Girl’s