वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: साक्षी कानडी ९८ , पूजा वाघ ३ बळी

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , पहिल्या सामन्यात वरिष्ठ महिला नाशिक जिल्हा संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघावर १६२ धावांनी मोठा विजय मिळवला. एक दिवसीय मर्यादित ५० षटकांच्या स्वरूपात सदर स्पर्धा पुणे , औरंगाबाद , जळगाव व कोल्हापूर येथे खेळवली जात असून हा सामना पी जी क्रिकेट मैदान, पुणे येथे खेळवण्यात आला.
क्लब ऑफ महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून नाशिकला प्रथम फलंदाजी दिली. साक्षी कानडीच्या ९३ चेंडूतील फटकेबाज ९८ व सलामीवीर तेजस्विनी बाटवालच्या ४० धावांच्या जोरावर नाशिकने ४४.५ षटकांत सर्वबाद २७४ धावा केल्या. माया सोनवणेने ३६ व प्रियांका घोडकेने २५ धावा केल्या. क्लब ऑफ महाराष्ट्र संघाच्या संजीवनी पवारने ३ व किरण नवगिरेने २ बळी घेतले. विजयासाठीच्या २७५ धावांचा पाठलाग करताना नाशिकच्या गोलंदाजीसमोर कॉम संघ ४२ .५ षटकांत ११२ धावांत सर्वबाद झाला. नाशिकतर्फे पूजा वाघने सर्वाधिक ३ तर माया सोनवणे ,रसिका शिंदे, प्रियांका घोडके, शाल्मली क्षत्रिय , दिव्या गायकवाड व ईश्वरी सावकारने प्रत्येकी १ बळी घेतला व वरिष्ठ महिला नाशिक जिल्हा संघास मोठा विजय मिळवून दिला.