वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: सत्यजित बच्छावचे सामन्यात १५ बळी , मुर्तुझा ट्रंकवाला १०८

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन सुपर लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, पुणे येथे नाशिकने कोल्हापुर संघाविरुद्ध ७ गडी राखून विजय मिळवला. विजयाचा प्रमुख मानकरी ठरला तो सामन्यात तब्बल १५ बळी घेणारा रणजीपटू कर्णधार सत्यजित बच्छाव. फलंदाजीत शतकवीर मुर्तुझा ट्रंकवालाने महत्वाची कामगिरी केली.
नाशिकने पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून कोल्हापुरला प्रथम फलंदाजी दिली . कर्णधार सत्यजित बच्छावच्या भेदक डावखुरया फिरकीसमोर कोल्हापुरचा पहिला डाव २६ व्या षटकांत ११३ धावांत आटोपला. सत्यजितने १२.१ षटकांत २ निर्धाव ४५ धावा देत ८ गडी बाद केले. तेजस पवार व तन्मय शिरोडेने प्रत्येकी १ बळी घेतला. नाशिकने सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाच्या १०८ धावांच्या जोरावर २७० धावा केल्या .सौरभ गडाखने ३७ , कुणाल कोठावदेने ३२ तर यासर शेखने ३० धावा केल्या . १५७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या कोल्हापुरने दुसऱ्या डावात ६० षटकांत २२० धावा केल्या. सत्यजित बच्छावने दुसऱ्या डावातही जोरदार गोलंदाजीचे प्रदर्शन करताना कोल्हापुर संघाचे ७ गडी बाद केले – २०.४ षटकांत ५ निर्धाव ४९ धावा देत ७ गडी टिपले. तेजस पवार, प्रतीक तिवारी व पवन सानपने प्रत्येकी १ बळी घेतला. नाशिकने विजयासाठीच्या ६४ धावा १२.२ षटकांत ३ गडी गमावून केल्या व सुपर लीग मध्ये लागोपाठ दुसरा निर्णायक विजय मिळवला.