राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा -साहिल पारख ,प्रतीक तिवारी व रोहन शेडगे प्रभावी,युनाइटेड.पारसी जिमखान्याचेही निर्णायक विजय

नाशिक- येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , नाशिकने सातारावर १ डाव व ३७ धावांनी मोठा विजय मिळविला. नाशिकचा डावखुरा सलामीवीर साहिल पारखच्या तडाखेबंद शतकामुळे तसेच प्रतीक तिवारी व रोहन शेडगेच्या सामन्यातील अनुक्रमे ८ व ७ बळींमुळे नाशिकला हे यश संपादन करता आले.
महात्मा नगर क्रिकेट मैदानावर साताराने नाणेफेक जिंकुन नाशिकला प्रथम फलंदाजी दिली. साहिल पारखने २१ चौकार व ३ षटकारांसह ८८ चेंडूत खणखणीत १२६ धावा ठोकल्या. त्यास पुष्कर अहिररावची ५६ धावांची साथ मिळाल्याने दोघांनी १८३ धावांची जोरदार सलामीची भागीदारी केली . साई राठोडने ४४ व प्रसाद दिंडेने २८ धावा केल्या. नाशिकने ५९ .२ षटकांत ३०० धावा केल्या. साताराच्या आर एस आदित्यने ८ गडी बाद केले. उत्तरादाखल साताराने पहिल्या दिवसअखेर २ बाद ११३ धावा केल्या.
दुसऱ्या दिवशी दिसली सर्वांची एकी
दुसर्या दिवशी नाशिकने सातारा संघास ४३.१ षटकांत १५७ धावांत सर्वबाद केले, ते रोहन शेडगेच्या ६ बळींमुळे. त्यास प्रतीक तिवारीने ३ व हुजैफ शेखने १ बळी घेऊन साथ दिली. फॉलो ऑन नंतर दुसऱ्या डावातही नाशिकच्या गोलंदाजांनी सातारा संघास २९.१ षटकांत १०६ धावांत गुंडाळले. दुसऱ्या डावात कर्णधार प्रतीक तिवारीने ५, केयूर कुलकर्णीने ३ तर रोहन शेडगे व हुजैफ शेखने प्रत्येकी १ बळी घेऊन नाशिकला सातारावर १ डाव व ३७ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.
युनाइटेड,पारसी जिमखान्याचे सहज विजय
इतर दोन सामन्यांत संदीप फौंडेशनच्या मैदानावर यूनायटेड ने हिंगोली वर १ डाव व ४७ धावांनी दणदणीत विजय मिळला. (संक्षिप्त धावफलक : यूनायटेड पहिला डाव २८३ वि हिंगोली पहिला डाव १६१ व फॉलो ऑन नंतर दुसऱ्या डाव ७५. सामन्याचा मानकरी – यूनायटेडचा निमिर जोशी – सामन्यात ७ बळी ).
एस एस के मैदानावर पारसी जिमखानाने श्री साई युवा क्रिकेट अकादमी वर ७ गडी राखून विजय मिळवला. (संक्षिप्त धावफलक : श्री साई युवा क्रिकेट अकादमी पहिला डाव ७४ व दुसरा डाव १४७ वि पारसी जिमखाना पहिला डाव १८८ व दुसरा डाव ३ बाद ३४ . सामन्याचा मानकरी – पारसी जिमखानाचा ऋषिकेश फुले – सामन्यात ७ बळी ).