वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या सुपर लीग क्रिकेट स्पर्धा- सत्यजितची अष्टपैलू कामगिरी,मुर्तझाच्या ११२ धावा, यासर शेखही चमकला

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन सुपर लीग ),उपांत्य फेरीच्या दोन दिवसीय कसोटी सामन्यात आर्यन्स विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीवर मात करत नाशिक जिल्हा क्रिकेट संघाने अंतिम फेरीत धडक मारली. रणजीपटू कर्णधार अष्टपैलू सत्यजित बच्छाव – ५ बळी व नाबाद अर्धशतक, सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवाला ११२ व यासर शेख ७८ धावा व ३ बळी घेणारा तेजस पवार हे विजयाचे खरे मानकरी ठरले.
डेक्कन जिमखाना पुणे येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात आर्यन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६५.२ षटकांत २१५ धावा केल्या. पुरंजय राठोडने ४९ तर हरी सावंतने ४६ धावा केल्या. नाशिकतर्फे रणजीपटू कर्णधार सत्यजित बच्छावने ५ गडी बाद केले. तेजस पवारने ३ तर तन्मय शिरोडेने १ गडी बाद केला. उत्तरादाखल पहिल्या दिवस अखेर नाशिकचे सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवाला नाबाद ८२ व यासर शेख नाबाद ४५ अशी जोरदार सुरुवात करत २६ षटकांत १२८ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी आदल्या रात्री पडलेल्या पावसामुळे उपहारपर्यंत खेळ होऊ शकला नाही .नाबाद १२८ वरून पुढे खेळताना दोघांनी ३५.२ षटकांत १७९ धावांची सलामी दिली. सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने ११२ धावा करून स्पर्धेतील आपला सुर कायम ठेवत तिसरे शतक झळकवले. यासर शेखने ७८ धावा केल्या. त्यानंतरचे ३ गडी लवकर बाद झाले. ५ बाद १९४ पासून याआधीच्या सामन्याप्रमाणेच सत्यजित बच्छावने नाबाद ५५ व कुणाल कोठावदेने नाबाद २० धावा करत, ६० षटकांत ५ बाद २७१ धावा करत आर्यन्सवर सहजपणे पहिल्या डावात आघाडी घेत वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला .
साखळी,अव्वल साखळीतही सर्वीत्तम कामगिरी
नाशिक जिल्हा संघाने साखळी व अव्वल साखळीत – लीग व सुपर लीग – सामन्यांत जोरदार कामगिरी करत स्पर्धेत सहभागी महराष्ट्राचे २१ जिल्हे व २७ नामवंत क्लबज् अशा एकूण ४८ संघांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम स्थान पटकवत उपांत्य फेरी गाठली होती .
स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत फलंदाजीत सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने पहिले स्थान पटकवताना १० सामन्यातील १४ डावात ३ शतके व ६ अर्धशतकांसह ८९६ धावा फटकावल्या आहेत. यासर शेख, कुणाल कोठावदे, सिद्धार्थ नक्का, सौरभ गडाख व शर्विन किसवे यांनीहि वेळोवेळी फलंदाजीत महत्वाचे योगदान दिले. तर गोलंदाजीत सत्यजित बच्छावने १५ डावात ४८ बळी आणि तन्मय शिरोडेनेहि १७ डावात ३५ बळी घेत प्रभावी कामगिरी केली आहे. त्याबरोबरच फिरकीपटू तेजस पवार, प्रतीक तिवारी व मध्यमगती पवन सानपनेहि प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेण्यात आपला वाटा उचलला. यष्टीरक्षक सौरभ गडाखनेहि १० सामन्यात १३ बळी टिपत संघाच्या यशाला हातभार लावला आणि महत्वाचे म्हणजे फलंदाजीत देखील सत्यजित बच्छावने १ शतक व ४ अर्धशतके झळकवत आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप पाडली. या प्रकारे उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर रणजीपटू कर्णधार सत्यजित बच्छावच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या क्रिकेटपटूंनी अंतिम फेरी गाठली.यापूर्वी २०१४ मध्ये ही स्पर्धा नाशिक ने ४३ वर्षांनंतर जिंकली होती. आता ९ वर्षांनंतर पुन्हा विजयाची संधी नाशिक ला मिळाली आहे.
या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना डी व्ही सी ए बरोबर होत आहे.
नाशिक जिल्हा क्रिकेट संघाला निवड समिति सदस्य सतीश गायकवाड, तरुण गुप्ता ,फैयाज गंजीफ्रॉकवाला व नाशिक क्रिकेट ऑपरेशन कमिटीचे मुख्य राजेंद्र लेले यांचे मार्गदर्शन लाभले . प्रशिक्षक शांताराम मेणे आहेत. या लक्षणीय कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करून स्पर्धेतील पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.