नाशिकची उपांत्य फेरीत धडक

वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या सुपर लीग क्रिकेट स्पर्धा- पहिल्या डावातील आघाडीवर मिळवले सर्वांधिक गुण, बी गटाचे विजेतेपद मिळवत यश

नशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए सिनियर इन्विटेशन सुपर लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात, पुणे येथे नाशिकने सहारा विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवले. यासह बी गट विजेतेपद मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नाशिक जिल्हा संघाने साखळी व अव्वल साखळीत – लीग व सुपर लीग – सामन्यांत जोरदार कामगिरी करत स्पर्धेत सहभागी महराष्ट्राचे २१ जिल्हे व २७ क्लबज् अशा एकूण ४८ संघांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम स्थान पटकवले.

सातत्यपूर्ण कामगिरीचा सखोल विचार कायम

सुरवातीला साखळी लीग मध्ये नाशिक जिल्हा क्रिकेट संघाच्या खेळाडुंनी, औरंगाबाद येथे खेळताना लक्षणीय कामगिरी केली व ब गट विजेतेपद मिळवत सुपर लीग मध्ये प्रवेश केला.ब गटात समावेश असलेल्या नाशिक संघाने ५ साखळी सामन्यातील ३ सामन्यांत – किंग्स स्पोर्ट्स क्लब , पुणे , लातूर व हिंगोली वर निर्णायक विजय मिळवले तर औरंगाबाद विरुद्ध पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळविला. फक्त डेक्कन जिमखाना विरुद्धच्या सामन्यात नाशिक संघाने पहिल्या डावाच्या आघाडीचे गुण गमावले होते.तर त्यानंतरच्या अव्वल साखळीत – सुपर लीग – सामन्यांत बी गटात पुणे येथील विविध मैदानांवर खेळताना नाशिकने आपल्या कामगिरीचा आलेख अधिकच उंचावला. सिंधुदुर्ग , कोल्हापुर व सेक्रेटरी इलेवन संघाविरुद्ध निर्णायक विजय मिळवले तर पावासमुळे एक दिवस वाया गेलेल्या शेवटच्या सामन्यात सहारा संघावर आघाडी घेत गट विजेतेपद मिळवून उपांत्य फेरीत रुबाबात प्रवेश केला.

सांघिक यशाचे यशस्वी दर्शन

शेवटच्या सामन्यात पहिला दिवस पावसाने वाया गेल्यावर दुसऱ्या दिवशी सहारा क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली करताना ५२ षटकांत ७ बाद २८० धावा करून डाव घोषित केला. अवधूत दांडेकरने सर्वाधिक नाबाद ९० केल्या. नाशिकतर्फे कर्णधार सत्यजित बच्छावच्या ३ बळींना , पवन सानप २ तर मुर्तुझा ट्रंकवाला व तेजस पवार प्रत्येकी १ बळी यांची साथ मिळाली. उत्तरादाखल कुणाल कोठावदे , सत्यजित बच्छाव व मुर्तुझा ट्रंकवाला यांच्या अर्धशतकांच्या जोरावर नाशिकने ४६ व्या षटकांत ५ बाद २८५ धावा करत सहारावर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले. सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने स्पर्धेतील आपला आक्रमक सुर कायम ठेवत ४६ चेंडूत ६९ धावा फटकवल्या . यासर शेखने ३२ धावा केल्या. ५ बाद १४४ पासून कुणाल कोठावदेने नाबाद ७४ व सत्यजित बच्छावने नाबाद ७१ धावा करत सहारावर आघाडी घेतली.

सर्वच खेळाडूंची प्रयत्नांची पराकाष्ठा

आतापर्यंत वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या या स्पर्धेत फलंदाजीत सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने पहिले स्थान पटकवताना ९ सामन्यातील १३ डावात २ शतक व ६ अर्धशतकांसह ७८४ धावा फटकावल्या आहेत. यासर शेख, कुणाल कोठावदे, सिद्धार्थ नक्का, सौरभ गडाख व शर्विन किसवे यांनीहि वेळोवेळी फलंदाजीत महत्वाचे योगदान दिले. तर गोलंदाजीत सत्यजित बच्छावने १४ डावात ४३ बळी आणि तन्मय शिरोडेनेहि १६ डावात ३४ बळी घेत प्रभावी कामगिरी केली आहे. त्याबरोबरच फिरकीपटू तेजस पवार, प्रतीक तिवारी व मध्यमगती पवन सानपनेहि प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेण्यात आपला वाटा उचलला. यष्टीरक्षक सौरभ गडाखनेहि ९ सामन्यात १३ बळी टिपत संघाच्या यशाला हातभार लावला आणि महत्वाचे म्हणजे फलंदाजीत देखील सत्यजित बच्छावने १ शतक व ३ अर्धशतके झळकवत आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप पाडली. या प्रकारे उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर रणजीपटू कर्णधार सत्यजित बच्छावच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या क्रिकेटपटूंनी संघाला प्रथम स्थान प्राप्त करून दिले.

या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना गुणतालिकेतील नंबर ४ चा संघ आर्यन्स विरुद्ध डेक्कन जिमखाना पुणे येथे १३ व १४ एप्रिल रोजी होत आहे.

पुढील वाटचालीसाठी संघटनेच्या शुभेच्छा

नाशिक जिल्हा क्रिकेट संघाला , नाशिक क्रिकेट ऑपरेशन कमिटीचे मुख्य राजेंद्र लेले यांचेसह निवड समिति सदस्य सतीश गायकवाड, तरुण गुप्ता व फैयाज गंजीफ्रॉकवाला यांचे मार्गदर्शन लाभले . तर प्रशिक्षक आहेत शांताराम मेणे.या लक्षणीय कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करून स्पर्धेतील पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

X