वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा– सांगलीवर ८ गडी राखून विजय, ईश्वरी सावकारची अष्टपैलू चमक

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , दुसऱ्या सामन्यात वरिष्ठ महिला नाशिक जिल्हा संघाने सांगलीवर ८ गडी राखून विजय मिळवत लागोपाठ तिसऱ्या विजयाची नोंद केली. या विजयामुळे गट विजेत्यांचा मान मिळाला शिवाय अव्वल साखळीत – सुपर लीग – मध्ये प्रवेश केला.
एक दिवसीय मर्यादित ५० षटकांच्या स्वरूपात सदर स्पर्धा पुणे , औरंगाबाद , जळगाव व कोल्हापूर येथे खेळवली गेली, त्यात हा सामना पी ओ आय सी क्रिकेट मैदान, पुणे येथे खेळवण्यात आला.
नाणेफेक जिंकून सांगलीने प्रथम फलंदाजी केली. नाशिकच्या गोलंदाजीसमोर सांगली संघ ४४.५ षटकांत १२९ धावांत सर्वबाद झाला. नाशिकतर्फे ईश्वरी सावकारने सर्वाधिक ४ , माया सोनवणेने ३, लक्ष्मी यादवने २ व प्रियांका घोडकेने १ गडी बाद केला. विजयासाठीच्या १३० धावांचा पाठलाग करताना नाशिकने ईश्वरी सावकारच्या ५५ धावांच्या जोरावर ३० व्या षटकात आठ गडी राखून विजय मिळवला. प्रियांका घोडकेने नाबाद ३२ तर तेजस्विनी बाटवालने २६ धावा केल्या. याप्रकारे वरिष्ठ महिला नाशिक जिल्हा संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र, पी वाय सी व सांगली असे लागोपाठ तीन विजय मिळवले.