महिलांच्या राज्य क्रिकेट स्पर्धेत नाशिक,पुण्याची घौडदौड सुरुच

महिलांच्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा : कार्तिकी गायकवाड,प्रचिती भवर,वैभवी बालसुब्रमण्यमची चमकदार कामगिरी,दुसऱ्या विजयात मोलाचा वाटा

नाशिक- येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील महिलांच्या आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत नाशिकने धुळे संघावर १४० धावांनी तर पुणेने रत्नागिरीवर ५ गडी राखून विजय मिळवत लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली .

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे ही स्पर्धा एक दिवसीय स्वरूपात नाशिक येथे होत आहेत. नाशिकचा समावेश अ गटात असून रत्नागिरी ,पुणे व धुळे हे इतर संघ आहेत.

यजमानांपुढे धुळे संघ निष्प्रभ,६६ धावात गारद

महात्मानगर मैदानावर नाशिक विरुद्ध धुळे सामन्यात नाशिकच्या विजयात कार्तिकी गायकवाड व कर्णधार प्रचिती भवर या दोघींनी अष्टपैलू कामगिरी केली. प्रथम फलंदाजी मिळालेल्या नाशिकने २०६ धावा केल्या. कार्तिकी गायकवाडने सर्वाधिक ४६ , प्रचिती भवर व वैभवी बालसुब्रमणीयमने प्रत्येकी ३० धावा केल्या. धुळ्याच्या नेहा चव्हाणने ४ , भूमी निंबाळकर व वेदांतिकाने प्रत्येकी २ व ज्ञानदा निकमने १ बळी घेतला. उत्तरादाखल नाशिकच्या गोलंदाजांसमोर धुळे संघ केवळ ६६ धावाच करू शकला. सिद्धि पिंगळेने ३ तर श्रुती गीते, प्रचिती भवर व कार्तिकी गायकवाडने प्रत्येकी २ बळी घेत संघाला १४० धावांनी मोठा विजय मिळवून देत स्पर्धेतील लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली.

पुण्याचा सहज विजय

दुसऱ्या सामन्यात एस एस के मैदानावर पुणेने विरुद्ध रत्नागिरी वर ५ गडी राखून मात केली. रत्नागिरीने प्रथम फलंदाजी करत ९१ धावा केल्या. प्रांजल पवारने सर्वाधिक ३१ धावा केल्या. पुण्याच्या श्रुती भांगेने ४ व अक्षया जाधवने २ बळी घेतले. विजयासाठीच्या ९२ धावा पुण्याने ५ गडी गमावून पार करत दुसऱ्या विजयाची नोंद केली. प्रांजली पिसेने सर्वाधिक २२ , अथश्री शिवरकरने नाबाद १८ व राशी व्यासने १६ धावा केल्या. रत्नागिरीच्या कनक यादवने प्रत्येकी २ बळी घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

X