राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा:हुजैफ शेखचे सामन्यात ९ बळी, पारसी जिमखानाला आघाडीचे गुण

नाशिक- येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या ( एम सी ए इन्विटेशन लीग ), दोन दिवसीय कसोटी सामन्यात , नाशिकने श्री साई युवा क्रिकेट अकादमी वर ८ गडी राखून मोठा विजय मिळविला. हुजैफ शेखच्या सामन्यातील ९ बळींमुळे हा विजय सुकर झाला.
महात्मा नगर क्रिकेट मैदानावर श्री साई युवा क्रिकेट अकादमीने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांत १२८ धावा केल्या. व्यंकटेश माणवेलीकरने सर्वाधिक ४० धावा केल्या. नाशिकतर्फे साहिल पारखने ४ , रोहन शेडगेने ३ , शिवंश सिंगने २ तर हुजैफ शेखने १ बळी घेतला. उत्तरादाखल नाशिकने आठव्या क्रमांकावरील समकीत सुराणाच्या नाबाद ५९ धावांच्या जोरावर ६२ धावांची आघाडी घेत ३८ षटकांत ८ बाद १९० वर डाव घोषित केला. सलामीवीर पुष्कर अहिररावने ३८ व प्रसाद दिंडेने २७ धावा केल्या. दुसऱ्या डावात श्री साई युवा क्रिकेट अकादमीला लेग स्पिनर हुजैफ शेखच्या जोरदार ८ बळींमुळे नाशिकने २८.४ षटकांत ९० धावांत गुंडाळले. विजायासाठीच्या २९ धावा ८ गडी राखून पार करत नाशिकने लागोपाठ दुसरा मोठा विजय मिळवला.
इतर दोन सामन्यांत एस एस के मैदानावर यूनायटेडने सातारावर १ डाव व १२५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ( संक्षिप्त धावफलक : सातारा पहिला डाव १२६ व दुसरा डाव १०८ वि यूनायटेड पहिला डाव ८ बाद ३५९ ).तर संदीप फौंडेशनच्या मैदानावर पारसी जिमखानाने हिंगोली वर पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले . (संक्षिप्त धावफलक : पारसी जिमखाना पहिला डाव ९ बाद २५५ वि हिंगोली पहिला डाव १०५ व फॉलो ऑन नंतर दुसऱ्या डाव ३ बाद ७३).