
वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा: प्रियंकाचे नाबाद अर्धशतक,२ गडी बाद करत गोलंदाजीतही चमक
नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय, वरिष्ठ महिला आमंत्रितांच्या साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत , दुसऱ्या सामन्यात वरिष्ठ महिला नाशिक जिल्हा संघाने पी वाय सी, पुणे संघावर १०४ धावांनी मोठा विजय मिळवत लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली.
एक दिवसीय मर्यादित ५० षटकांच्या स्वरूपात सदर स्पर्धा पुणे , औरंगाबाद , जळगाव व कोल्हापूर येथे खेळवली जात असून हा सामना विराग क्रिकेट मैदान, पुणे येथे खेळवण्यात आला. नाशिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. प्रियांका घोडकेच्या नाबाद ५१ , ईश्वरी सावकार ४२, साक्षी कानडी ३६ तर रसिका शिंदे २८ धावा यांच्या फलंदाजीच्या जोरावर नाशिकने ५० षटकांत ७ बाद १८६ धावा केल्या. पी वाय सीच्या इशिता खळे व अनया कुलकर्णीने प्रत्येकी २ बळी घेतले. विजयासाठीच्या १८७ धावांचा पाठलाग करताना नाशिकच्या गोलंदाजीसमोर पी वाय सी संघ ३१ .५ षटकांत ८२ धावांत सर्वबाद झाला. नाशिकतर्फे ऐश्वर्या वाघने सर्वाधिक ३ , प्रियांका घोडके व लक्ष्मी यादवने प्रत्येकी २ तर रसिका शिंदेने १ बळी घेतला आणि वरिष्ठ महिला नाशिक जिल्हा संघाला १०४ धावांनी विजयी केले.