न्यु इलेव्हन बॉइज,सिध्दीविनायक संघाची आगेकूच

हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफी: सय्यद मुशीर संघाचे आव्हान संपुष्टात, फलंदाजीत रोहीत सुराणा,भरत जाधव, गोलंदाजीत रोहित पाटील,गणेश सुर्यवंशीचे वर्चस्व

नाशिक- जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित, मेसन ट्रेडर्स व मेसन डेव्हलपर्स पुरस्कृत हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या खुल्या गटात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर पाचव्या दिवशी न्यू इलेवन बॉइज व सिद्धिविनायक यांनी आपले पहिले सामने जिंकले.

पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यू इलेवन बॉइजने प्रथम फलंदाजी करत न्यू नाशिक इलेवन विरुद्ध सर्वबाद १९१ धावा केल्या. रोहित सुराणाने सर्वाधिक ३८ तर भरत जाधवने ३३ धावा केल्या. न्यू नाशिक इलेवनच्या थोड्या महागड्या ठरलेल्या सनी धनगरने ३ व शोएब मणियारने २ गडी बाद केले. उत्तरादाखल न्यू नाशिक इलेवनला अंकुश शेवाळे ४५ , शोएब मणियार ३२ व ओम पवारच्या २७ धावांच्या जोरावर सर्वबाद १५४ इतकीच मजल मारता आली. न्यू इलेवन बॉइजच्या सुभाष पवार , समीर जोशी ,मनीष नवापरिया व रोशन शिरसाट ने प्रत्येकी २ तर रोहित सुराणा व संतोष गंगावणेने प्रत्येकी १ बळी घेत संघाला ३७ धावांनी विजयी केले.

नऊ गडी राखून आरामात विजय

दुसऱ्या एकतर्फी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून सय्यद मुशिरला सिद्धिविनायक विरुद्ध प्रथम फलंदाजी करत सर्वबाद ८४ इतकीच मजल मारता आली. फैजान सय्यदने सर्वाधिक ३५ धावा केल्या. सिद्धिविनायकचे गोलंदाज रोहित पाटील ४, गणेश सूर्यवंशी ३ तर ऋषिकेश विधातेने २ बळी घेत प्रभावी कामगिरी केली. विजयासाठीच्या ८५ धावा चिरायू ब्रम्हेचा ३८ व पवन माळोदे नाबाद ३६ यांच्या फलंदाजीच्या जोरावर सिद्धिविनायकने ९ गडी राखून आरामात पार केल्या. दुसऱ्या पराभवामुळे सय्यद मुशिरचे आव्हान साखळीतच संपले.

स्पोर्टवोटवर सामने पाहण्याची सुवर्ण संधी

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन – एन डी सी ए – ची डिजिटल सहयोगी स्पोर्टवोट, मुंबई ने नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथील हकीम मर्चंट क्रिकेट ट्रॉफीच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण प्रसारण सुरू केले आहे. स्पोर्टवोट हे अॅप डाउनलोड करून सर्व क्रीडाप्रेमी या सामन्यांचा आनंद कोठूनही थेट घेऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published.

X