राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालील ):पुष्कर अहिरराव १३८ व शर्विन किसवे १११

नाशिक-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) स्पर्धेत, दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने युनायटेड विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले. आर्यन्स क्रिकेट मैदान, पुणे येथे हा सामना झाला.
प्रथम फलंदाजी करत नाशिकने पुष्कर अहिरराव १३८ व कर्णधार शर्विन किसवे १११ यांच्या जोरदार शतकांच्या जोरावर ९० षटकांत ४३८ धावा केल्या. मोहम्मद ट्रंकवालाने ८० व साहिल पारखने ७४ धावा केल्या.उत्तरादाखल युनायटेडने ९० षटकांत २४६ धावा केल्या. केयूर कुलकर्णीने ४ , गुरमान सिंग रेणु व हुजैफ शेखने प्रत्येकी २ तर रोहन शेडगे व समकीत सुराणाने प्रत्येकी १ गडी बाद करत नाशिकला पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळवून दिले.
नाशिकचे तीन संघाविरूध्द पहिल्या डावाच्या आघाडीवर गुण
सुपर लीगच्या ४ सामन्यांत नाशिकने एम सी ए रेड, एम सी व्ही एस व युनायटेड या तीन संघांविरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले व डी व्ही सी एस विरुद्ध गमावले. या आमंत्रितांच्या एकूण स्पर्धेत नाशिकतर्फे फलंदाजीत कर्णधार शर्विन किसवेने ८ डावांत सर्वाधिक ५५८ तर पुष्कर अहिररावने १३ डावांत ५१९ धावा केल्या. गोलंदाजीत हुजैफ शेखने १६ डावांत सर्वाधिक ३८ तर रोहन शेडगेने ३० बळी घेतले.