राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धा ( १९ वर्षांखालील ): पुष्कर अहिररावचे तडाखेबाज शतक,केयूर कुलकर्णी,साई राठोडची उत्कृष्ठ साथ

पुणे- वडकी(जि.पुणे) येथील विराग क्रिकेटच्या मैदानावर सुरु असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या, राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या अव्वल साखळी क्रिकेट ( इन्व्हिटेशन सुपर लीग ) दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने एम सी ए रेड विरुद्ध पहिल्या डावातील आघाडीचे गुण घेतले.
पहिल्या दिवशी नाशिकने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर पुष्कर अहिररावच्या जोरदार १०७ धावांच्या ( १११ चेंडू , १४ चौकार व ४ षटकार ) जोरावर ७४ षटकांत २८३ धावा केल्या. पुष्करने केयूर कुलकर्णीसह ३५.२ षटकांत १४८ धावांची सलामीची भागीदारी केली. केयूरने ४३ व साई राठोडने ४२ धावा केल्या. एम सी ए रेडच्या केदार बजाज व शिवराज शेळकेने प्रत्येकी ४ गडी बाद केले.
नाशिकने लादला फॉलोआँन,हुजैफ शेखचे तीन बळी
उत्तरादाखल पहिल्या दिवसअखेर एम सी ए रेडने ४ बाद ६४ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी नाशिकने १४८धावांत सर्वबाद करून फॉलोऑन दिला. गुरमान सिंग रेणुने ३, हुजैफ शेख व केयूर कुलकर्णीने प्रत्येकी २ तर रोहन शेडगे व समकीत सुराणाने प्रत्येकी १ गडी बाद केला. दुसऱ्या डावात मात्र एम सी ए रेडच्या चैतन्य पाटील व अमर भांडवलकरने शतक झळकवत नाशिकला निर्णायक विजय मिळवून दिला नाही. ४ बाद २७८ या स्थितीत सामना संपला. नाशिकतर्फे हुजैफ शेखने ३ व रोहन शेडगेने १ गडी बाद केला.