नऊ वर्षानंतर पुन्हा यश: रोमहर्षक अंतिम लढतीतील सामना अनिर्णित,कर्णधार सत्यजित बच्छावचे थरारक नाबाद दिड शतक, मुर्तझा,किसवे,शेखही चमकले

नाशिक- नाशिककरांसाठी गुड न्युज आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या आमंत्रिताच्या क्रिकेट स्पर्धेत ( एम सी ए सिनियर इन्विटेशन लीग )नाशिकने विजेतेपद पटकावले आहे. यापूर्वी २०१४ मध्ये हि स्पर्धा नाशिकने ४३ वर्षांनंतर जिंकली होती. त्यानंतर आता पुन्हा ९ वर्षांनी नाशिकच्या क्रिकेपटुंनी नाशिककरांना अभिमान वाटावा अशी दैदिप्यमान कामगिरींची नोंद केली आहे.

अव्वल साखळीत – सुपर लीग – सामन्यांत नाशिकने तीन निर्णायक विजय मिळवले होते . त्या तुलनेत अंतिम फेरीतील डी व्ही सी ए ला दोनच निर्णायक विजय मिळाले होते . म्हणून अंतिम फेरी अनिर्णित राहिल्यांतरहि नाशिक अजिंक्य ठरले. नाशिक जिल्हा संघाने साखळी व अव्वल साखळीत – लीग व सुपर लीग – सामन्यांत जोरदार कामगिरी करत स्पर्धेत सहभागी महराष्ट्राचे २१ जिल्हे व २७ नामवंत क्लबज् अशा एकूण ४८ संघांमध्ये सर्वाधिक गुण मिळवत प्रथम स्थान पटकावले होते .
सर्वीत्तम कामगिरी, सामना रोमहर्षक स्थितीत
अंतिम फेरीचा नाशिक व डी व्ही सी ए यांच्यातील तीन दिवसीय कसोटी सामना अतिशय रोमहर्षक स्थितीत अनिर्णित राहिला. सामन्याची वेळ संपली तेव्हा पहिल्या डावातील आघाडीपासून नाशिक संघ केवळ ८ धावा दूर राहीला होता. अप्रतिम कर्णधाराची खेळी करत सत्यजित बच्छाव दमदार १५२ धावांवर नाबाद राहीला.

पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट मैदानावर प्रथम फलंदाजी मिळालेल्या डी व्ही सी एने पहिल्या दिवसअखेर ९० षटकांत ६ बाद ३५८ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी पहिल्या दोन्ही सत्रातील वेळ ओल्या मैदाना मुळे वाया गेला . त्यानंतर एकूण १०४ षटकांत ९ बाद ४५० करून डी व्ही सी एने डाव घोषित केला .पवन शाहने सर्वाधिक १६९ धावा केल्या. त्यास ओम भोसले ७३, , यश जगदाळे ६१ व ओमकार राजपूत ४७ अशी साथ मिळाली . नाशिकतर्फे तन्मय शिरोडे व पवन सानपने प्रत्येकी २ तर मुर्तुझा ट्रंकवाला, तेजस पवार , प्रतीक तिवारी व सत्यजित बच्छावने प्रत्येकी १ गडी बाद केला.
सत्यजित,मुर्तुझा अन् यासरही चमकले
उत्तरादाखल दुसऱ्या दिवस अखेर नाशिकचे सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवाला नाबाद ६९ व यासर शेख नाबाद ३५ यांनी २२ षटकांत १०९ धावांची जोरदार शतकी सलामीची भागीदारी केली. नाशिक अजून ३४१ धावांची मागे होते .तिसऱ्या दिवशी १७३ धावांची सलामीची भागीदारी झाल्यावर यासर शेख ६२ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ शतकवीर मुर्तुझा ट्रंकवालाहि १०२ धावांवर बाद झाला. त्यानंतरचे दोन्ही फलंदाज लवकर बाद झाले. बिनबाद १७३ ते ४ बाद १९८ या स्थितीतून शर्विन किसवे व कर्णधार सत्यजित बच्छावने ११३ धावांची भागीदारी करत ३११ पर्यंत मजल मारली . शर्विन किसवेने ७५ धावा केल्या. सहाव्या क्रमांकावर अतिशय जबाबदारीने फलंदाजी करत सत्यजितने स्पर्धेतील आपले दुसरे शतक झळकवले . पण ५ बाद ३११ नंतर पुन्हा दुसऱ्या बाजूला ठराविक अंतराने खेळाडू बाद होत गेल्याने , मोठ्या भागीदारीसाठी सत्यजित बच्छावला जोडीदार मिळाला नाही.
९ बाद ३९९ पासून अकराव्या क्रमांकावरील पवन सानपने ७५ मिनिटे ३६ चेंडू शांतपणे खेळत कर्णधाराला शेवटपर्यंत साथ दिल्याने नाशिकने ९ बाद ४४३ पर्यंत मजल मारली. ४ बाद १९८ वर फलंदाजीला आलेल्या सत्यजितने जवळजवळ सहा तास ३५४ मिनिटे संघाची धुरा वाहत २७२ चेंडूत ३ षटकार व १७ चौकारांच्या सहाय्याने नाबाद १५४ धावा करत अप्रतिम कर्णधाराची खेळी करत नाशिकला पहिल्या डावातील आघाडीच्या अगदी जवळ आणले . कसोटी सामन्याची वेळ संपली तेव्हा डी व्ही सी ए ( ९ बाद ४५० ) वरती आघाडी घेण्यासाठी ८ धावा ( ९ बाद ४४३ ) बाकी होत्या.

या वरिष्ठ राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत फलंदाजीत सलामीवीर मुर्तुझा ट्रंकवालाने पहिले स्थान पटकवताना ११ सामन्यातील १५ डावात ४ शतके व ६ अर्धशतकांसह तब्बल ९९८ धावा फटकावल्या. सर्वोच्च धावसंख्या १६७ . सरासरी ७६.७७, स्ट्राइक रेट ११३.२८. त्यात एकूण ३८ षटकार व १३८ चौकार . यासर शेख ( १४ डावात ५५६ धावा ) , कुणाल कोठावदे, सिद्धार्थ नक्का, सौरभ गडाख व शर्विन किसवे यांनीहि वेळोवेळी फलंदाजीत महत्वाचे योगदान दिले.

रणजीपटू कर्णधार सत्यजित बच्छावने स्पर्धेत उत्कृष्ट नेतृत्वाबरोबरच अष्टपैलू चमक दाखवत फलंदाजीत २ शतके व ४ अर्धशतके झळकवत १० डावात ५४७ धावा केल्या तर गोलंदाजीत १० सामन्यातील १६ डावात ४९ बळी घेतले व अर्थातच अंतिम लढतीत नाबाद १५२ धावांची अविस्मरणीय खेळी केली.
तन्मय,तेजस,सौरभही ठरले प्रभावी
तन्मय शिरोडेनेहि १८ डावात ३७ बळी घेत प्रभावी कामगिरी केली. त्याबरोबरच फिरकीपटू तेजस पवार, प्रतीक तिवारी व मध्यमगती पवन सानपने हि प्रतिस्पर्धी संघाचे २० बळी घेण्यात आपला वाटा उचलला. यष्टीरक्षक सौरभ गडाखनेहि १० सामन्यात १५ बळी टिपत संघाच्या यशाला हातभार लावला . या प्रकारे उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर सत्यजित बच्छावच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या क्रिकेटपटूंनी हे अभिमानास्पद यश मिळवले .नाशिक जिल्हा क्रिकेट संघाला , निवड समिति सदस्य सतीश गायकवाड, तरुण गुप्ता फैयाज गंजीफ्रॉकवाला व नाशिक क्रिकेट ऑपरेशन कमिटीचे मुख्य राजेंद्र लेले यांचे मार्गदर्शन लाभले, तर प्रशिक्षक आहेत शांताराम मेणे होते.या लक्षणीय विशेष कामगिरी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे यांनी सर्व खेळाडुंचे खास अभिनंदन केले .
Great 👍